जिल्हा परिषद विषय समितीत रत्नागिरीला दोन पदे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीच्या पंधरा सदस्यांपैकी सहा हे शिवसेनेत आलेले आमदार भास्कर जाधव यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे निवड बिनविरोध होईल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे.

रत्नागिरी - जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड मंगळवारी (ता. 14) होणार असून रत्नागिरी तालुक्‍याला दोन पदे मिळण्याची शक्‍यता आहे. त्यात समाजकल्याणसह आरोग्य व बांधकाम सभापतीपदाचा समावेश राहील. त्यात अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या बाबू म्हाप यांची बांधकाम सभापतीपदावर तर शिक्षण समितीवर खेडचे सुनील मोरेंची वर्णी लागु शकते. महिला बालकल्याणचा निर्णय महाविकास आघाडीवर अवलंबून आहे. 

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीच्या पंधरा सदस्यांपैकी सहा हे शिवसेनेत आलेले आमदार भास्कर जाधव यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे निवड बिनविरोध होईल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे. जिल्हा नियोजनवर ज्या सदस्यांची निवड झाली आहे, त्यांना पदांवर नियुक्‍त करण्यात येणार नसल्याचे सुरवातीला ठरले होते. तिसऱ्या टप्प्यासाठी अकरा सदस्यच शिल्लक आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाल्यामुळे नऊ सदस्यातून चार पदांवर नियुक्‍ती दिली जाईल. त्यासाठी चढाओढ असली तरीही सर्व तालुक्‍यांना समान न्याय देण्याचे धोरण सेनेकडून घेण्यात आले आहे. 

हेही वाचा - लयभारी ! श्री मार्लेश्वरवारी करणारा असाही दिव्यांग भक्त 

अध्यक्षपदाच्या शर्यतीतील बाबू म्हाप यांना हे सभापतीपद

ठरलेल्या धोरणानुसार रत्नागिरी तालुक्‍याच्या पदरात यावेळी दोन सभापतिपदे पडतील. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या बाबू म्हाप यांना यावेळी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती पद मिळेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. म्हाप हे मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यासाठी ते प्रयत्न करतील. समाजकल्याणसाठीचे उमेदवार रत्नागिरीतच असल्यामुळे ती संधी हातखंबा गटातील परशुराम कदम यांना मिळू शकते. त्यांच्याबरोबरच वाटद गटातील ऋतुजा जाधव यांचेही नाव चर्चेत आहे. हा निर्णय म्हाप यांच्यावर अवलंबून राहील. महिला व बाल कल्याणसाठी लक्ष्मी शिवलकरांसह आणखीन एक नाव चर्चेत आहे. परंतु महाविकास आघाडीला हे पद देण्याचा निर्णय झाला तर ते पद राष्ट्रवादीला दिले जाऊ शकते. शिक्षण सभापतिपदासाठी सुनील मोरे यांच्यावर जवळजवळ शिक्‍कामोर्तब झाल्याचे समजते. 

जाधवांनी नाराजी उघड केल्याचा हा परिणाम.. 

दरम्यान, या निवडीत आमदार भास्कर जाधव समर्थकांची वर्णी लागलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जाधवांनी नाराजी उघड केल्याचा हा परिणाम असल्याची चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची येथे होणार हकालपट्टी

आघाडीला पद देण्यासाठी प्रस्ताव 

महाविकास आघाडीचा फॉर्म्युल्याचा विचार रत्नागिरीत होईल, अशी चर्चा होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यासाठी फिल्डींग लावली होती. पण रायगडमध्ये सेनेला संधी द्या, तर रत्नागिरीत तसा निर्णय घेऊ, या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Has Two Posts In Zilla Parishad Subject Committee