रत्नागिरी : कार्तिकीत चक्क आषाढधारांची हजेरी...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

रत्नागिरी : कार्तिकीत चक्क आषाढधारांची हजेरी...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी ः हवामान विभागाचा अंदाज बरोबर ठरला अन् रत्नागिरी, खेड तालुक्यांना मुसळधार पावसाने तडाखा दिला. दापोली, मंडणगडात ढगाळ वातावरण होते; तर चिपळूण, संगमेश्‍वरसह लांजा-राजापुरात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सायंकाळी एक तास कोसळलेल्या पावसाने रत्नागिरीकरांची तारांबळ उडाली. कार्तिकीत आषाढसरी कोसळल्या, तसेच तुलसी विवाहाच्या उत्साहावर शब्दशः पाणी फेरले. सततच्या पावसाने आंबा मोहोराचे नुकसान होणार असून, फवारणीचा खर्चही वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली. त्यानुसार आज दिवसभर पावसाळी वातावरण होते. उष्माही वाढल्याने पावसाची स्थिती होती. दुपारी अचानक ऊन पडले. मात्र, चारच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास हा पाऊस पडत होता. ठिकठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे ओहोळ वाहत होते.

रत्नागिरी शहरात काही भागांत पाणी साचल्याने वाहतुकीला त्रास झाला. गणपतीपुळे पर्यटनस्थळी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची तारांबळ उडाली. तालुक्यात सगळीकडेच पावसाचा तडाखा बसला. तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट सुरू झाल्याने शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला.

रत्नागिरी व खेड तालुका वगळता अन्य चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूरसह लांजात पावसाने हजेरी लावली. खेडमध्ये सायंकाळी सव्वासहानंतर वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. राजापुरात अवघा दहा मिनिटे पाऊस झाला; तर मंडगणड, दापोलीत ढगाळ वातावरण होते.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

तुळशी विवाह उरकले

कार्तिकी एकादशीनंतर गावोगावी तुळशी विवाह लावले जातात. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते; परंतु सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने त्यावर पाणी फेरले. वाडी-वस्तीमधील ग्रामस्थ एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरोघरी जात तुळशी विवाह लावतात. पावसामुळे घाईगडबडीत हा कार्यक्रम उरकण्यात आला. काहींनी पावसाने विश्रांती घेतली तेवढ्या कालावधीत कार्यक्रम उरकून घेतला. पावसामुळे फटाक्यांची आतषबाजी करता आली नाही.

loading image
go to top