
रत्नागिरी : दोन महिन्यांत पडलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या ३ मध्यम प्रकल्पांपैकी एक आणि ६० लघु प्रकल्पांपैकी ४६ प्रकल्प १०० टक्के भरून वाहू लागले आहेत. गडनदी मध्यम प्रकल्पात यावर्षी पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यातील तिवरे, पणदेरी, बेर्डेवाडी, कोंडवाडीचा या चार प्रकल्पात यंदा दुरूस्तीसाठी पाणी साठा कमी ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या तीनही प्रकल्पांचा एकूण निर्मितीसाठा ४६६.४२ दशलक्ष घनमीटर इतका आहे तर उपयुक्त साठा ४४४.१२ दशलक्ष घनमीटर इतका आहे. आतापर्यंत या तीनही धरणांमध्ये ३५१.३३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी या तीनही मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ३६९.९२ इतका पाणीसाठा २३ जुलैअखेर होता. नातूवाडी प्रकल्पात गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा २०.२५ दशलक्ष घनमीटर होता. यंदा तो १८.३८ दशलक्ष घनमीटर आहे.
गडनदी प्रकल्पात गतवर्षी उपयुक्त पाणीसाठा ६६.३८ दशलक्ष घनमीटर होता. यंदाही तेवढाच पाणीसाठा आहे, तर अर्जुना प्रकल्पात गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा ७२.५६ दशलक्ष घनमीटर इतका होता. शंभर टक्के साठा यंदाही आहे. नातूवाडी प्रकल्पात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. यंदा ६० लघुप्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याचा संचय केला आहे. त्यापैकी ४६ धरणे पूर्णपणे भरलेली आहे. गतवर्षीही यावेळी ही धरणे १०० टक्के भरली होती. १ जूनपासून २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत २८६१ मि.मी. सरासरी नोंद झाली होती. तुलनेत कमी पाऊस झाला असला तरीही धरणांसाठी पूरक ठरला आहे.
मोठ्या नद्यांचे पाणी प्रकल्पात
जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी आणि बावनदी या मुख्य नद्यांचा प्रवाह वाहतो. जगबुडी नदीचे पाणी नातूवाडी प्रकल्पात सोडले जाते. तसेच वाशिष्ठीवर फणसवाडी, शास्त्री आणि सोनवी नदीवर तेलेवाडी, काजळीवर आंजणारी, कोदवलीवर चिंचवाडी, मुचकुंदीवर मुचकुंदी आणि बावनदीच्या पाण्यावर मोर्डे धरण बांधलेले आहे.
एक नजर...
जिल्ह्यात लघुप्रकल्प ६७
लघुप्रकल्प पाटबंधारे विभागाचे १६
यंदा साठा कमी केला ४
यंदा पाणीसाठा केलेले लघुप्रकल्प ६०
पूर्णपणे भरलेली धरणे ४६
एक दृष्टिक्षेप..
१ जूनपासून २४ जुलैपर्यंतचा पाऊस
जिल्ह्यात सरासरी - १८५२ मि.मी.
गतवर्षी याच कालावधीत - २८६१ मि.मी.
पणदेरीच्या दुरूस्तीसाठी आराखडा बनवणार..
जिल्ह्यात ६७ लघुप्रकल्प असून त्यापैकी १६ लघुप्रकल्प पाटबंधारे विभागाचे आहेत. उर्वरित पाटबंधारे विभागाचे आहेत. त्या ६७ लघुप्रकल्पांपैकी चार प्रकल्पात यंदा साठा कमी करण्यात आला आहे. त्यात तिवरे, पणदेरी, बेर्डेवाडी, कोंडवाडी यांचा समावेश आहे. पणदेरी प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी आराखडा बनवण्याचे काम नाशिकच्या संस्थेला देण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर दुरूस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.