रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

शहर विकास आघाडी तयार करून अपक्ष उमेदवार रिंगणात उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी मिलिंद कीर यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेऊन कीर यांनी आपले इरादे निश्‍चित केले आहेत.

रत्नागिरी - नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत सर्वपक्षीय शहर विकास आघाडीचा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू असून, स्वाभिमानचा कौल बुधवारी (ता. 17) मिळण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय शहरातील स्थानिक नेत्यांवर सोपविण्यात आला असून, तशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी रत्नागिरी दौऱ्यात दिल्या आहेत. 

रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीने पोटनिवडणूक लागण्याची शक्‍यता आहे. शिवसेना-भाजपची युती जवळजवळ निश्‍चित झाली असून, त्यांना तगडे आव्हान निर्माण करण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट करण्याचा कुवारबाव पॅटर्न रत्नागिरी शहरात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान, मनसे, वंचित आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकवटणार आहे.

शहर विकास आघाडी तयार करून अपक्ष उमेदवार रिंगणात उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी मिलिंद कीर यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेऊन कीर यांनी आपले इरादे निश्‍चित केले आहेत. त्यावेळी खासदार तटकरे यांनी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांकडे सोपविले आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष सुदेश मयेकर यांची जबाबदारी वाढली असून, ते लवकरच बैठक घेणार असल्याचे समजते. शहर विकास आघाडीच्या उमेदवाराबाबत मयेकर सकारात्मक आहेत. तटकरेंकडून स्थानिक नेत्यांकडे धुरा सोपविली गेल्याने आघाडीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू आहे. 
 
स्वाभिमानचा सहभाग उपयुक्‍त 
विकास आघाडीमध्ये स्वाभिमानचाही समावेश करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी शहरात चांगली मते घेणाऱ्या स्वाभिमानचा सहभाग उपयुक्‍त ठरू शकतो. आघाडीतील सहभागाबाबतचा निर्णय उद्या होण्याची दाट शक्‍यता आहे. स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याचे वृत्त आहे. त्यांचा दौरा झाला, तर आघाडीतील सहभागावर शिक्‍कामोर्तब होईल. त्यानंतरच उमेदवार निश्‍चित करण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri municipal corporation bye-elections report