
रत्नागिरी : सेनेपाठोपाठ राष्ट्रवादीची चाचपणी बैठक
दाभोळ : शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर दापोली विधानसभा मतदारसंघातील मुंबई येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सभा झाल्यावर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली असून, दापोली विधानसभा मतदारसंघातील दोन प्रमुख पक्षाच्या झालेल्या बैठकीमुळे आगामी काळात दापोली विधानसभा मतदार संघातील वातावरण ढवळून निघणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संजय कदम यांचा पराभव झाल्यानंतरही दापोली विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीची ताकद त्याच प्रमाणात शिल्लक असल्याचे वारंवार पाहावयास मिळाले. विकासकामांमध्ये माजी आमदार संजय कदम हे कोठेही मागे राहिले नाहीत. त्याचप्रमाणे दापोली मतदार संघातील प्रत्येक गावात पूर्वीप्रमाणेच संजय कदम यांचा संपर्क पाहावयास मिळत आहे. राज्यामध्ये असलेल्या महाविकास आघाडीच्या शासनामध्ये अर्थमंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,
रायगडचे खासदार सुनील तटकरे, रत्नागिरीचे माजी पालकमंत्री अनिल परब यांच्या माध्यमातून संजय कदम यांनी कोट्यवधीची विकासकामे दापोली मतदार संघामध्ये आणली आहेत; मात्र शिवसेनेमध्ये नुकत्याच झालेल्या राजकीय उठावानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले. आमदार योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.
शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवण्यात आले व पुढील विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख जो उमेदवार देतील, त्याचे काम करून दापोली मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा कायम राहील, यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे ठरवण्यात आले.
राष्ट्रवादीच्या बैठकीतही माजी आमदार संजय कदम, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण यांच्यासह दापोली विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीतही दापोली विधासभा मतदार संघात घरोघरी राष्ट्रवादी पक्ष पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून पुन्हा या मतदार संघात पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
Web Title: Ratnagiri Ncp Test Meeting After Army
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..