एलईडीद्वारे मच्छीमारी करणाऱ्या नौकांपर्यंत अधिकाऱ्यांना नेणार - संजय कदम

राजेश लिंगायत
सोमवार, 29 जानेवारी 2018

हर्णै - एलईडीच्या वापराने जेथे मासेमारी चालते, तेथे थेट जाऊन त्या नौकांवर तिथल्या अधिकाऱ्यांना घेऊन कारवाई करायला लावू, अन्यथा आमदार म्हणून कायदा हातात घ्यावा लागेल. त्यासाठी मी सदैव माझ्या कोळीबांधवांच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही आमदार संजय कदम यांनी दिली.

हर्णै - एलईडीच्या वापराने जेथे मासेमारी चालते, तेथे थेट जाऊन त्या नौकांवर तिथल्या अधिकाऱ्यांना घेऊन कारवाई करायला लावू, अन्यथा आमदार म्हणून कायदा हातात घ्यावा लागेल. त्यासाठी मी सदैव माझ्या कोळीबांधवांच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही आमदार संजय कदम यांनी दिली.

हर्णै बंदरामध्ये आयोजित एलईडी फिशिंगविरोधी आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. श्री. कदम म्हणाले की, सरकारने जर एलईडी फिशिंगच्या विरोधात कायदा केला आहे, तर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे जर पायबंद बसत नसेल तर कायदा हातात घेऊन कारवाई करायला या मच्छीमारांबरोबर आम्हालाही पुढे यावेच लागेल. न्याय मिळवून देण्यासंबंधी माझ्यावर 25 खटले आहेत, त्यात माझ्या मच्छीमारांना न्याय मिळवून देण्याकरिता आणखीन एखादी केस झाली तरी फरक पडणार नाही. कोळी समाजाचे भांडुपचे आमदार अशोक पाटील उपस्थित होते.

वेगेवेगळ्या पक्षाचे असलो तरी, कोकणातले म्हणून मच्छीमारांसाठी कोणतेही राजकारण न करता एकत्र येत आहोत. एलईडी फिशिंग बंद झाली पाहिजे हा मुद्दा आगामी अधिवेशनात उचलून धरू

- अशोक पाटील, आमदार,  भांडुप

काही दिवसांपूर्वीच दाभोळ खाडीमध्ये लोटे येथील रसायन सोडले गेले. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. समुद्रातील माश्‍यांबरोबर इतर जीव किनाऱ्यावर आले होते. तसेच लाखो रुपये किमतीचा एलईडी लाईट वापरून माश्‍यांचे डोळे फोडून सरसकट मासळी मारली जाते . कोकणातल्या मंत्र्यांचं याकडे दुर्लक्षच होत आहे; असा टोला पर्यावरण मंत्र्यांचे नाव न घेता आमदार कदम यांनी लगावला.

भांडुपचे आमदार अशोक पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. जो कायदा केला जातो त्याची अंमलबाजावणीच सरकारकडून होत नाही तर असे सरकार पुन्हा येणार नाही आणि याकरिता आम्हा कोळीबांधवांना समुद्रात उतरून संघर्ष करावा लागला तरी चालेल. मी स्वतः माझ्या कोळीबांधवांबरोबर कायदा हातात घ्यायला तयार आहे, असे पाटील म्हणाले.

Web Title: Ratnagiri News Akroash Melava in Harne