इथिलीन फवारणी केल्याने आंबा व्यवसायावर परिणाम शक्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

रत्नागिरी - आंबा पिकविण्यासाठी इथिलीन फवारणी केल्याने एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) मुंबईत केलेल्या कारवाईने आंबा व्यवसायावर परिणाम होण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्‍त होत आहे.

रत्नागिरी - आंबा पिकविण्यासाठी इथिलीन फवारणी केल्याने एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) मुंबईत केलेल्या कारवाईने आंबा व्यवसायावर परिणाम होण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्‍त होत आहे.

इथिलीन वापराला परवानगी असतानाही ऐन हंगामात प्रशासनाकडून उचललेल्या पावलांमुळे बागायतदार नाराज झाले आहेत. उत्पादन कमी असल्याने दर चढे राहावेत यासाठी बागायतदार प्रयत्नशील आहेत, अशा स्थितीत वाशीतील गोंधळ धक्‍कादायक आहे.

आंबे पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर सुरक्षित असून, बायर कंपनीचे हे उत्पादन लेबल क्‍लेम मान्यताप्राप्त आहे.’’
- संजय पानसरे,
व्यापारी

पेस्ट्रीसाईडचा वापर करणाऱ्या अन्य उत्पादनांवरही कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. आंब्यासंदर्भातील या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये चुकीचा मेसेज जाणार आहे. याचा शेतकऱ्यांना त्रास होणार आहे.
- प्रसन्न पेठे,
बागायतदार, रत्नागिरी

हापूस आंबा पिकवण्यासाठी यापूर्वी कॅल्शियम कार्बाईडच्या भुकटीचा वापर केला जात होता. जागतिक आरोग्य संस्थेने फळे पिकविण्यासाठी कॅल्शियमच्या वापरावर बंदी घातली. भारत, पाकिस्तानात त्याचा वापर हापूस पिकविण्यासाठी होत होता. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने बंदी घातली. तोही निर्णय आंबा हंगाम ऐन बहरात असतानाच घेतला होता. त्याला पर्याय म्हणून इथिलीन रसायनांच्या फवारणीला परवानगी दिली.

घाऊक बाजारात व्यापाऱ्यांनी आंबा पिकविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. ते व्यापारी इथिलीन गॅस चेंबरमध्ये हापूस पिकवतात. सामान्य व्यापाऱ्यांसाठी वाशी बाजार समितीत चेंबर सुरू केले. परंतु ते अपुरे पडत होत. वैयक्तिक रापलिंग चेंबर उभारणे शक्‍य नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे इथिलीनचा वापर फळे पिकविण्यासाठी केला जाऊ लागला. कर्नाटक, तमिळनाडू, केरळच्या हापूस आंबा पेटीत ही बेथिलीनची फवारणी होते.

अन्न सुरक्षा प्राधिकरणने मार्चमध्ये काढलेल्या परिपत्रकात बेथिलीन व इथिलीन फवारणीत इथेफॉन नावाचे रसायन कॅल्शियम कार्बाईड एवढेच घातक असल्याचे स्पष्ट केले. आंबे पिकवण्यासाठी इथिलीनच्या वापरावर अन्न व औषध विभागाच्या ठाणे पथकाने ‘एपीएमसी’त छापा टाकून इथिलीनची फवारणी केलेले हापूस जप्त केले. व्यापाऱ्यांनी नैसर्गिक अथवा गॅस चेंबरमध्ये हापूस आंबा पिकवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन अन्न व औषध विभागाने केले आहे. ही बाब सोशल मीडियावर आल्यामुळे ग्राहकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक झालेल्या कारवाईचा परिणाम व्यवसायावर होऊ शकतो, अशी भीती व्यापाऱ्यांसह कोकणातील बागायतदारांमध्ये आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News Ethylene spraying on Mango