नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरीवर शिवसेनेची मदार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 June 2018

चिपळूण - पालघरच्या पराभवाने डिवचली गेलेली शिवसेना भाजपला कोकण पदवीधर मतदारसंघात आव्हान देणार आहे. त्यामुळे मागीलवेळी डावखरे यांना पडद्यामागून साथ देणार्‍या शिवसेनेसोबत आता दोन हात करावे लागणार आहेत. परिणामी या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’ अपेक्षित आहे. शिवसेनेची नवी मुंबई, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यावर भिस्त आहे. सिंधुुदुर्ग आणि रायगडमध्ये सेनेला भाजप विरोधकांची साथ मिळाल्यास सेनेला विजय अवघड नाही. 

पालघरप्रमाणे कोकण पदवीधरची जागा शिवसेनेने लढवेली नव्हती. 25 जूनला होणार्‍या या निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये उडी घेतली. शिवसेनेकडून ठाणे शहराचे माजी महापौर संजय मोरे आणि राष्ट्रवादीकडून नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी मिळाली आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने डावखरे यांना आतून मदत केल्याने भाजपचा परंपरात मतदारसंघात पराभव झाला होता. विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सेनेने रवींद्र फाटक यांना उमेदवारी देऊन वसंत डावखरे यांना पराभूत केले होते. आता त्यांचे पुत्र निरंजन यांच्या विरोधातही शिवसेनेनी शड्डू ठोकला आहे. 

डावखरेंबद्दलच्या नाराजीचा लाभ कोणाला

कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर निरंजन डावखरे कुठेही चर्चेत नव्हते. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी आहे. स्वार्थासाठी त्यांनी पक्ष सोडल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितले जात आहे. भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे जुने कार्यकर्तेही नाराज आहेत. भाजप आणि डावखरेंबद्दलच्या नाराजीचा फायदा विरोधक किती उचलतात, हे पाहावे लागणार आहे. 

संजय मोरे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून मताधिक्य देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नियोजन सुरू आहे. 

- उमेश खताते, युवासेना तालुका अधिकारी, चिपळूण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News Konkan Graduate constituency special