कोकणातील जुन्या पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट

 राजेश कळंबटे
शुक्रवार, 9 मार्च 2018

रत्नागिरी - सावित्रीच्या दुर्घटनेनंतर कोकणातील जुन्या पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यातील काही पुलांची दुरुस्तीही झाली; मात्र गेल्या दोन दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांची पाहणी केंद्रीय भूपृृष्ठ खात्याच्या अभियंत्यांकडून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्‍यातील पुलांचे ऑडिट संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

रत्नागिरी - सावित्रीच्या दुर्घटनेनंतर कोकणातील जुन्या पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यातील काही पुलांची दुरुस्तीही झाली; मात्र गेल्या दोन दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांची पाहणी केंद्रीय भूपृृष्ठ खात्याच्या अभियंत्यांकडून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्‍यातील पुलांचे ऑडिट संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

महामार्गावरील सर्व पूल ब्रिटिशांच्या काळात बांधलेले आहेत. त्यापैकी बहुसंख्य पुलांचे आयुष्य अभियांत्रिकीच्या दृृष्टिकोनातून यापूर्वीच संपुष्टात आलेले आहे. महामार्गावरील महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे झालेल्या भीषण अपघातानंतर या पुलांच्या सुरक्षिततेबाबतच्या चर्चेने जोर धरला. त्यातून महामार्गावरील सर्वच पुलांच्या सध्याच्या स्थितीची तपासणी (स्ट्रक्‍चरल ऑडिट) करण्याचा निर्णय केंद्रीय भूपृृष्ठ खात्याच्या अखत्यारितील नॅशनल हाय वे ऍथॉरिटी ऑफ इंडियातर्फे घेण्यात आला. त्यानुसार या पुलांच्या तपासण्या नियमितपणे केल्या जात आहेत. यापूर्वी एका संस्थेमार्फत ऑडिट झाले होते.

सोनवी नदीवरील पुलाचे आॅडिट

आज सकाळी सोनवी नदीवरील पुलांचे ऑडिट सुरू होते. त्यासाठी सोलापूर येथून विशिष्ट क्रेन मागविण्यात आली होती. त्या क्रेनमधून पुलाचे खांब, आतील प्लास्टर याची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामध्ये दुरुस्ती करणे अत्यावश्‍यक असेल तर त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी आवश्‍यक खासगी मालकीच्या जमिनींचा मोबदला संबंधित जागामालकांना देऊन सुमारे 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमीन संपादित झाली आहे. ताब्यात आलेल्या जमिनीवरील झाडे-झुडपे तोडून सपाटीकरणाचे काम चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्‍यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र या महामार्गावरील जुन्या पुलांना समांतर नवीन पूल बांधण्याच्या कामांचा प्रारंभ सुमारे दीड वर्षापूर्वी होऊनही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पुलांचे काम रखडले आहे. कंत्राटदार नसल्याने ते काम आणखीन काही दिवस सुरू होणे अशक्‍य आहे. पुलांची कामे पावसाळ्यापूर्वी विशिष्ट टप्पा पूर्ण न केल्यास या संपूर्ण योजनेचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडू नये, यासाठी आधीच ही पाहणी केली जात आहे. 

दरम्यान, सावित्री दुर्घटनेनंतर ध्रुव कन्सल्टन्सीने फेब्रुवारी 2017 पासून मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांची तपासणी केली. 18 मोठ्या पुलांसह एकूण 72 पुलांची तपासणी झाली. त्या अहवालानुसार महामार्गावरील 21 पुलांच्या दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या. त्यात रत्नागिरीतील वाशिष्टी, सोनवी, शास्त्री, बावनदी, सप्तलिंगी, आंजणारी आदी पुलांसह सिंधुदुर्गतील तराळा, कासार्डे, जानवली, कसाळ, भंजाळ आणि पिंगुळी आदींचा समावेश होता. त्यामध्ये पुलांचे मजबुतीकरण, फाउंडेशन दुरुस्ती, तळ भागाकडील स्लॅब स्टील दुरुस्ती, गनॅटिंग, जॅकेटिंग आदी दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. त्या तपासणीत महामार्गावरील एकही पूल धोकादायक नसल्याचा पुढे आले होते. एकवीस पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा दुरुस्ती प्रस्ताव तयार केला होता. त्यातील काही दुरुस्त्या पूर्ण झाल्या आहेत. 

Web Title: Ratnagiri News structural audit of old bridge in Konkan