Ratnagiri : निमंत्रणच नाही, आढाव्याची गरज काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri panchayat samiti

Ratnagiri : निमंत्रणच नाही, आढाव्याची गरज काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सरस दिवाळी महोत्सवाचे आम्ही यजमान होतो. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी, पदाधिकारी याला उपस्थित होते; मात्र पंचायत समितीच्या सभापतींचे नाव निमंत्रण पत्रिकेत नाही किंवा त्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. कसली विचारणा झाली नाही, हे योग्य नाही. त्यामुळे सरसमध्ये काय झाले याच्या आढाव्याची आम्हाला गरज नाही, या शब्दात सदस्य गजानन पाटील यांनी आढावा सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या मासिक सभेत रोखले. त्यामुळे सभेचे वातावरण काही काळ गंभीर झाले; मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी पुढील विषय घेऊन वेळ मारून नेली.

हेही वाचा: कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; पालिकेचा होणार राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव!

पंचायत समिती सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली आजची मासिक सभा झाली. या वेळी उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. विषयपत्रिकेवरील विषयांनुसार खातेप्रमुखांकडून आढावा घेण्यात आला. या वेळी ग्रामीण विकास यंत्रणेचा आढावा देताना दिवाळीमध्ये झालेल्या सरस दिवाळी महोत्सवाचा आढावा खातेप्रमुख चव्हाण यांनी दिला. तेव्हा सरस महोत्सवामध्ये हिरकणी बचत गट आणि कोकण रत्न मिरजोळे गट सर्वोत्कृष्ट ठरले. या महोत्सवामध्ये मोठी उलाढाल झाली. डिसेंबरमध्ये पुन्हा महोत्सव घेण्याचा विचार आहे, असा आढावा दिला.

एवढ्यात सदस्य गजानन पाटील म्हणाले, एवढा मोठा सरस दिवाळी महोत्सव झाला. रत्नागिरी तालुक्याकडे याचे यजमानपद होते. पंचायत समिती सभापती यांचे निमंत्रण पत्रिकेवर नाव येणे आवश्यक होते. तसेच त्यांना महोत्सवासाठी निमंत्रण करायला हवे होते; मात्र साधी विचारणाही झाली नाही, हे योग्य नाही. त्यामुळे सरसचा आढावा देण्याची गरज नाही, असे स्पष्ट करत आढावा थांबवला. भाजपच्या सदस्या चव्हाण यांनीही आक्षेप घेत म्हणाल्या, सरसमध्ये साधे सभापतींचे नावदेखील घेतले नाही. सभेत नंतर जलजीवन मिशन योजनेतून तालुक्यात १ कोटी ९७ लाखाची ८ कामे घेण्यात आल्याचे सांगणयात आले. त्यापैकी ३ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामध्ये पावस, पिरंदवणे, पानवल गावांचा समावेश आहे.

हेही वाचा: आरोपीचा कोठडीत मृत्यू; पोलिसांनी कुटुंबीयांना दिली नोकरीची ऑफर

आजच्या सर्व्हेसाठी एकही जिल्हा परिषदेची शाळा नाही

सभेत शिक्षण विभागाच्या आढाव्यावेळी शुक्रवारी (ता. १२) राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेसाठी तालुक्यातील ४६ शाळांची निवड झाली आहे. यामध्ये तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गांचा समावेश असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलभूत क्षमतेची तपासणी होणार आहे. निवड झालेल्या सर्व शाळा खासगी असल्याचा आक्षेप सदस्या स्नेहा चव्हाण यांनी घेत जिल्हा परिषदेचा शाळांचा विचार व्हायला हवा होता, असे मत मांडले.

loading image
go to top