रत्नागिरी : वीज वारंवार खंडित, ग्राहकांची नाराजी अखंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज पुरवठा खंडित

रत्नागिरी : वीज वारंवार खंडित, ग्राहकांची नाराजी अखंडित

संगमेश्वर: पावसाला दमदार सुरवात होण्याआधी संगमेश्वर तालुक्यात वारंवार वीजप्रवाह खंडित होत असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेले तीन दिवस जोरदार पाऊस पडू लागताच वीजप्रवाह खंडित होण्याच्या प्रकारात आणखी वाढ झाल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.

संगमेश्वर येथील महावितरण केंद्राला निवळी रत्नागिरी आणि आरवली येथून ३३ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा केला जातो. संगमेश्वर येथून पुढे देवरूख येथे ३३ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा करून देवरूख येथून परिसरातील गावांना वीजपुरवठा केला जातो. संगमेश्वर येथील वीजकेंद्रात वाशी, वांद्री, संगमेश्वर आणि कसबा-नायरी असे फीडर असून, यातील वांद्री आणि कसबा-नायरी फिडरवर सर्वाधिक वीजदाब आहे. संगमेश्वर येथे निवळी आणि आरवली येथून आलेली मुख्य वीजवाहिनी डोंगरदऱ्या, ओढे, नद्यांवरून आली असल्याने पावसाळ्यात मुख्य वीजवाहिनी नादुरुस्त झाल्यास हा दोष दूर करणे वीज कर्मचाऱ्यांसाठी मोठे जोखमीचे काम असते.

सद्यःस्थितीत संगमेश्वर येथे असणाऱ्या दोन मोठ्या रोहित्रांपैकी एक रोहित्र नादुरुस्त झाल्याने वीजवितरणाचा सर्व ताण या एकाच रोहित्रावर आला आहे. त्यातच वांद्री आणि कसबा नायरी फिडरवर काही दोष निर्माण झाल्यास साराच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. विजेच्या लपंडावाला ग्राहक कंटाळले असून याचा जाब विचारण्यासाठी महावितरण कार्यालयावर धडक द्यावी लागेल, असे सामाजिक कार्यकर्ते मिथुन निकम यांनी सांगितले.

१५ दिवसांत दुरुस्त न झाल्यास..

संगमेश्वर येथील नादुरुस्त रोहित्र नाशिक येथे दुरुस्तीला पाठवण्यात आले असून, ते दुरुस्त होऊन येण्यास सप्टेंबर महिना येणार असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. दुरुस्तीला नाशिक येथे पाठवलेले रोहित्र १५ दिवसांत दुरुस्त होऊन न आल्यास तसेच वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याचा खेळ न थांबल्यास महावितरण कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे पर्शुराम पवार यांनी सांगितले.

गणेशमूर्ती कारखानदार त्रस्त

यावर्षी गणेशोत्सव ३१ ऑगस्टला सुरू होणार असून, संगमेश्वर तालुक्यात असणाऱ्या असंख्य गणेशमूर्ती कारखान्यांमधून गणेशमूर्ती घडवण्याचे काम सुरू झाले आहे. अशा स्थितीत वारंवार वीजप्रवाह खंडित होण्याच्या प्रकारांमुळे तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदार त्रस्त झाल्याची माहिती युवा मूर्तिकार तुषार शिवलकर यांनी दिली.

गणेशोत्सवात तालुक्यातील विजेची मागणी दरवर्षी वाढत असते. अशा स्थितीत संगमेश्वर महावितरणचा वीज वितरणाचा कारभार एकाच रोहित्रावर कसा चालणार?

-पर्शुराम पवार, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Ratnagiri Power Outages Frequently Consumer Resentment Uninterrupted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..