रत्नागिरी : आरक्षणापूर्वीच निवडणुकीची पूर्वतयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Election

रत्नागिरी : आरक्षणापूर्वीच निवडणुकीची पूर्वतयारी

राजापूर : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण आणि निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही, तरी अनेक इच्छुकांनी आपल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात स्वतःचे नेटवर्क स्ट्राँग असल्याचा गाजावाजा करीत निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. निवडणुकीला इच्छुक असलेले उमेदवार आरक्षणापूर्वीच हालचालीच करू लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील रणांगणात भाऊगर्दी अन् कडव्या लढती होणार हे निश्‍चित आहे.

ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांच्या निवडणुका नव्या वर्षामध्ये होणार आहेत. त्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांनी आतापासूनच गट-गणात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन करण्यासह प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून गावोगावच्या ग्रामस्थांच्या बैठका घेण्यावर सध्या भर दिल्याचे दिसत आहे. या साऱ्या घडामोडीतून सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार बरसण्यास सुरवात झाली आहे. काहींनी पक्षाची उमेदवारी मिळण्याबरोबरच अपक्षही लढण्याची तयारी सुरू केली आहे. काहींनी मतदार संघामध्ये संपर्क दौरे करून ''राम...राम...नमस्कार'' करून जनसंपर्क वाढवताना मतदारांचे स्वतःकडे लक्ष वेधण्याला सुरुवात केली आहे. त्यातून सोशल मीडियावरही निवडणूक फिवर वाढू लागला आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

दृिष्टक्षेपात राजापूर तालुका

जिल्हा परिषद गटः ६ (ओणी, पाचल, केळवली, कोदवली, देवाचेगोठणे, सागवे)

पंचायत समिती गणः १२ (ओणी, ओझर, पाचल, ताम्हाणे, केळवली, कोंड्येतर्फ सौंदळ, कोदवली, भालावली, देवाचेगोठणे, साखरीनाटे, अणसुरे, सागवे)

संभाव्य आरक्षण डोळ्यांसमोर

कोणत्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये कोणते आरक्षण पडणार, याबाबतचे अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी मागील दोन निवडणुकींच्या वेळचे आरक्षण लक्षात घेऊन पुढील म्हणजे संभाव्य आरक्षणाचे इच्छुक उमेदवारांकडून आखाडे बांधले जात आहेत. त्याच्यातून संभाव्य आरक्षण डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

loading image
go to top