esakal | रत्नागिरीत दोन दिवस पुन्हा रेड अलर्ट; आतापर्यंत 214 मिमी पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत दोन दिवस पुन्हा रेड अलर्ट; आतापर्यंत 214 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरीत दोन दिवस पुन्हा रेड अलर्ट; आतापर्यंत 214 मिमी पावसाची नोंद

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी : जिल्ह्यात दोनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडून आपत्ती येण्याचा अंदाज असताना शुक्रवारी दिवसभरात रत्नागिरी, चिपळूण वगळता अन्यत्र अल्प पाऊस झाला. यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी निःश्‍वास सोडला. मात्र पुढील दोन दिवस पुन्हा रेड अलर्ट(Red alert)जारी केल्याने अति मुसळधार पावसाची टांगती तलवार कायम आहे.जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 11) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 12.37 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 18.30, दापोली 6.80, खेड 31.90, गुहागर 10.10, चिपळूण 5.10, संगमेश्‍वर 3.10, रत्नागिरी 8.30, लांजा 13.10, राजापूर 14.60 मिमी नोंद झाली आहे. (ratnagiri-rainfall-Red-alert-update-marathi-news)

जिल्ह्यात आतापर्यंत 214 मिमी सरासरी नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून 14 जुनपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत पावसाचा लवलेशही नव्हती. त्यानंतर वेगवान वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु झाला. राजापूर, सगंमेश्‍वर, खेड तालुक्यासह दापोलीत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. दिवसभरात काही वेळ ढगाळ वातावरण तर काही वेळ स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला होता.

मंडणगडात पडलेल्या पावसामुळे भारजा व निवळी नद्या प्रवाहित झाल्या; परंतु पाणी पातळी वाढलेली नव्हती. गुहागरमध्ये दिवसभरात पावसाने पाठ फिरवली. आमावस्येच्या भरतीमुळे किनारी भागात लाटांचे तांडव सुरु होते. चिपळूण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला; मात्र दुपारनंतर जोर ओसरला. त्यामुळे शिवनदी आणि वाशिष्ठी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. येथील पेठमाप परिसरात छोट्या पुलावरुन कमी उंची असल्याने पहिल्या पावसातच पाणी त्यावरुन जाण्यास सुरवात झाली होती.

रत्नागिरी तालुक्यात सकाळच्या सत्रात कडकडीत ऊन होते. दुपारनंतर वातावरण बदलले आणि मुसळधार सरींना सुरवात झाली. वेगवान वार्‍यासह धुवाधार पाऊस पडला. अतिवृष्टी पडणार अशीच स्थिती निर्माण झाली होती. दोन तासानंतर जोर ओसरला. काजळी नदीची पाणी पातळी सायंकाळी 12.06 मीटर इतकी होती. ती धोक्याच्या पातळीपेक्षा चार मिटरने कमी होती. सायंकाळपर्यंत एक तासाच्या अंतरात सरींचा जोर होता. रात्री पावसाने विश्रांती घेतली होती. रत्नागिरी शहरात रस्त्यावरुन पाणी वाहत होते. नळपाणी योजनेच्या खोदाईची कामे सुरु असल्यामुळे रस्ते चिखलमय झाले होते. अधूनमधून पडणार्‍या सरींमुळे बळीराजाची कामे वेगाने सुरु झाली आहेत.

हेही वाचा- शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत; नारायण राणेंचा दावा

दरम्यान, अति तिव्र मुसळधार पाऊस 12 जुनपर्यंत असेल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सरसकट जिल्ह्यात कर्फ्यू न लावता पुरप्रवण, दरडप्रवण क्षेत्रात प्रवासावर निर्बंध घातले आहेत.

विकेंड लॉकडाउनमुळे व्यवहार ठप्प

ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनातील चौथ्या स्तरातील निकष जिल्ह्यात लागू आहेत. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे. त्यामुळे आपसूकच बाहेर फिरणार्‍यांची संख्या कमीच असणार आहे. सगळीकडेच शुकशुकाट दिसणार आहे.