Ratnagiri : पाच वर्षांतील कमी पावसाची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri

Ratnagiri : पाच वर्षांतील कमी पावसाची नोंद

राजापूर : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून त्यातून भातशेतीला चांगलाच दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये पडलेल्या पावसाच्या तुलनेमध्ये यावर्षी कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कमी पडलेल्या या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुक्याला पाणीटंचाईची झळ पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आतापासूनच तालुक्यातून वाहणार्‍या नद्यांसह वहाळ आणि अन् जलस्त्रोतांच्या ठिकाणचे पाणी शक्य आहे त्या ठिकठिकाणी अडवणे अन् मुरवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यामध्ये दमदारपणे पाऊस पडत आहे. त्यातून, तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना अन् कोदवली नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. त्याचवेळी पडणाऱ्या पावसाने भातशेतीलाही बाळसे आले आहे.

काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारली असली तरी यावर्षी पावसाने मात्र काहीसे सातत्य राखल्याचे चित्र आहे. तरीही सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या पावसाच्या नोंदीचा विचार करता गेल्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी आणि यावर्षी पडलेल्या पावसाचा विचार करता गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सप्टेंबरपर्यंत एक हजार मिमीपेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

कमी पडलेल्या या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा पोहचण्याची शक्यता वर्तवले जात आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी आतापासून नियोजनबद्धरित्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तालुक्यातील वाहणार्‍या अर्जुना आणि कोदवली नद्यांसह गावागावांतून वाहणार्‍या मोठमोठ्या वहाळांचे शक्य आहे त्या ठिकाणी पाणी अडवणे अन् मुरवून त्या भागातील भूगर्भातील जलस्त्रोत वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी कायमस्वरूपी पाणी अडवण्याच्यादृष्टीने उपाययोजना करता येणे शक्य आहे का, या दृष्टीनेही विचारविनिमय होणे गरजेचे आहे.