फसवणुकीतील ७५ हजार परत मिळवून दिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

Ratnagiri : फसवणुकीतील ७५ हजार परत मिळवून दिले

रत्नागिरी : शहरातील तांबट आळी येथील तरुणाची ७५ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. शहर पोलिसांनी तपासात ही रक्कम सापडल्याने ती तरुणाला परत करण्यात आली. ११ महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र तत्काळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चक्रे फिरवली व त्या तरुणाला त्याची मोठी रक्कम परत मिळाली.

मंदार संभाजी पाटील (वय २५, तांबटआळी-रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंदार याने ७५ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाल्यानंतर तत्काळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार मंदार ऑनलाईनवरून कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याला धनी लोन या संकेतस्थळावर मनी फायनान्स या कंपनीकडून फोन आला व तुम्हाला कर्ज देतो, असे सांगून सुमारे ७५ हजार ४०० रूपयांची ऑनलाइन फसवणूक केली होती.

तक्रारीवर पोलिसांनी संशयित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले करत होते. तपासात मंदारने ज्या खात्यात पैसे वर्ग केले, ते खाते पोलिसांनी बँकेमार्फत सील केले होते. ही रक्कम हरियाणातील एका व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये गेली होते. पोलिसांनी सुरुवातीला येथील बॅंकेशी पत्रव्यवहार करून केला. त्यानंतर सायबर शाखेच्या मदतीने हरियाणातील त्या संशयित व्यक्तीचे बॅंकेचे अकाउंट सील केले. त्यामध्ये दोन लाखाची रक्कम होती. पोलिसांनी तेथील पोलिसांशी सपर्क साधून होते, अखेर कोर्टाच्या आदेशानुसार हे अकाऊंट सील केले होते.

त्यामुळे या अकाऊंटला असलेले पैसे संशयिताला काढता आले नाहीत. त्यानंतर बॅंकेच्या मदतीने पोलिसांनी हरियाणातील त्या व्यक्तीच्या फेक अकाऊंच्या खात्यात मंदारची जमा झालेली मूळ रक्कम परत मिळाली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलिस नाईक वैद्यही गुरव, विलास जाधव यांनी ही कामगिरी केली.

loading image
go to top