esakal | Ratnagiri : बार्जसाठी सुरूंच्‍या झाडांचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

suru ban

Ratnagiri : बार्जसाठी सुरूंच्‍या झाडांचा बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर : शहरातील वरचापाट मोहल्ला येथे समुद्रावर एल ॲण्ड टी कंपनीचे बार्ज वाहून आले होते. हे बार्ज वाहून जाऊ नये, म्हणून कंपनीने जाड दोरखंडांनी सुरुंना बांधले; मात्र लाटांवर बार्ज हेलकावल्याने अनेक सुरु मुळासकट उखडले आहेत. त्यामुळे आता वनविभाग एल ॲण्ड टी कंपनीवर कारवाई करणार का, कंपनीने सुरुंना दोरखंड बांधण्यापूर्वी वनविभागाची परवानगी घेतली होती का, झालेले नुकसान कंपनी कसे भरून देणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

एल ॲण्ड टी कंपनीद्वारे आरजीपीपीएल जेटी परिसरात समुद्रात भिंत (ब्रेकवॉटर वॉल) बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठे दगड समुद्राच्या तळाशी टाकण्यात येत आहेत. हे दगड आरजीपीपीएल जेटी हेड परिसरात एल ॲण्ड टी ने बांधलेल्या जेटीवरून समुद्रात नेण्याचे काम या बार्जद्वारे केले जाते.

सध्या काम बंद असल्याने ते एल ॲण्ड टी जेटीच्या बाजूला अरबी समुद्रात नांगर टाकून उभे होते. सोमवारी (ता. ६) समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे नांगर तुटून बार्ज भरकटले. गुहागर वरचापाट मोहल्ला परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर आले. हे बार्ज पुन्हा भरकटू नये, म्हणून ४ इंच जाड दोरखंड मोहल्ला येथे लागवड केलेल्या सुरुंना बांधून ठेवण्यात आले होते.

हेही वाचा: Ratnagiri : ‘सकाळ’ उघडला अन् हात जोडले गेले

आमचे वनरक्षक परशेट्ये यांनी पाहणी केली आहे. मीदेखील दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.

-राजश्री कीर, विभागीय वनाधिकारी, चिपळूण

सुरू पूर्ण वाढ झालेले नव्हते

दरम्यान, हे सुरू पूर्ण वाढ झालेले नाहीत. त्यामुळे भरती-आहोटीच्या लाटा आणि वाऱ्यामुळे हेलकावणाऱ्या जहाजाचे धक्के हे सुरु सहन करू शकले नाहीत. परिणामी काही सुरु मुळासकट उखडले तर काही सुरु जमिनीला टेकले. सुमारे ५० सुरुच्या झाडांचे यामध्ये नुकसान झाले आहे. त्यामुळे एल ॲण्ड टी कंपनीने अशाप्रकारे सुरुच्या लागवड केलेल्या रोपांना जाड दोरखंड बांधण्यापूवी वनविभागाला सांगितले होते का, झालेल्या नुकसानाबाबत कंपनी काय करणार, बेकायदेशीरपणे केलेल्या नुकसानाबाबत वनविभाग काय कारवाई करणार, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

सुरुंची लागवड करण्यास सांगितले : भोसले

या संदर्भात भाजपचे गुहागर नगरपंचायतीमधील गटनेते उमेश भोसले म्हणाले की, या नुकसानाची माहिती वनविभागाला मी दिली आहे. तसेच कंपनीला नुकसान झालेल्या सुरुंची लागवड करून देण्यास सांगितले आहे.

loading image
go to top