सरपंचांनीच ठोकले ग्रामपंचायतीला टाळे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

तुळसणी सरपंचांनी ग्रामसेवकाच्या मनमानीला वैतागून एक महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता.

देवरूख - संगमश्‍वर तालुक्‍यातील तुळसणी ग्रामपंचायतीला सरपंचानीच टाळे ठोकल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली. ग्रामसेवकाच्या कारभाराला कंटाळून हा प्रकार झाल्याने आणि याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 
ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून तुळसणीच्या सरपंच सौ. सिद्धी लाड यांनी आज ता. 11 रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. उपसरपंच दीपक आगरे व सर्व ग्रा.प. सदस्यांबरोबर पूर्ण गाव या रणरागिणीच्या पाठीशी उभा राहिल्याने आता ग्रामसेवकावर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे. 

तुळसणी सरपंचांनी ग्रामसेवकाच्या मनमानीला वैतागून एक महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. 6 महिन्यातील सभांचे प्रोसिडिंग नाही, जमाखर्च नाही, शासकीय निधींची व पत्रव्यवहार यांची माहिती नाही, विकासकामांमध्ये अडवणूक, कोऱ्या चेकवरील सह्या, सततची गैरहजेरी, मनमानी, रात्री अपरात्री ग्रामपंचायतीत येणे व जाणे याला सर्वच सदस्य वैतागले होते. ग्रामसेवक शेखर जाधव यांची पूर्वइतिहास देखील खूप वादग्रस्त असल्याचे उघड झाले होते.  कोकण कोकण कोकण 

हे पण वाचा - धक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार

 

आज या सर्व बाबींचा स्फोट झाल्याने सरपंचांनी रणरागिणीचा अवतार धारण केला आणि कार्यालयाला टाळे ठोकले. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच याची दखल गटविकास अधिकारी यांनी घेतली. त्यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून संबंधित ग्रामसेवकाची बदली करण्याचे आश्वासन दिले आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri sangmeshwar tulsi gram panchayat