
रत्नागिरी : शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे शुक्रवारी (ता. १६) रत्नागिरी दौऱ्यावर असल्याने त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर झळकले आहेत. काही बॅनरवर सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या फोटोंच्या गर्दीमध्ये शिंदे गटाच्या समर्थकांचे फोटो लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आम्ही सर्व सेनेत असल्याचे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा खुलासा शिंदे गटाच्या समर्थकांनी केला आहे. शिवसेनेचा हा शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न असणार आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर प्रथमच शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे संवाद निष्ठायात्रेच्या निमित्ताने रत्नागिरीत येत आहेत. रत्नागिरी, चिपळूण आणि दापोलीत त्यांची सभा होणार आहे. रत्नागिरीतील सभा भव्य करण्याचा आणि शक्तिप्रदर्शनाचा चंग सेनेने बांधला आहे. त्यासाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांतून सुमारे १५ हजार कार्यकर्ते दाखल होतील, असा दावा सेनेचे उपनेते राजन साळवी यांनी केला आहे. साळवी स्टॉप येथील जलतरण तलावासमोर ही सभा होणार आहे.
त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर गट, गणनिहाय कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी दिली आहे. या दौऱ्यानिमित्ताने आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर झळकले आहेत; परंतु त्यापैकी काही बॅनरवरून राजकीय चर्चेला जोरदार उधाण आले आहे. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सेनेकडून त्यापैकी एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर असणाऱ्या शिंदे समर्थकांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले. हा बॅनर सेनेकडूनच लावण्यात आल्याचा खुलासा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे. या बॅनरवर रोशन फाळके, विकास सावंत, वसंत पाटील, विकास पाटील, जितू शेट्ये आणि नायर यांचे फोटो आहेत; मात्र हे सर्वजण उदय सामंत समर्थक असल्याचा दावा रोशन फाळके यांनी केला आहे. या बॅनरमुळे सेनेने उसने अवसान आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काही तासांतच भाई सावंतांचा फोटो गायब
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात हुरळून जाऊन स्वागत बॅनर लावताना त्यामध्ये गंभीर चूक केल्याचे निदर्शनास आले. पत्नीच्या खुनाचा गंभीर आरोप असल्याचे प्रकरण ताजे असतानाही सेनेचे रत्नागिरी उपतालुकाप्रमुख सुकांत ऊर्फ भाई सावंत यांचा फोटो या स्वागत बॅनरवर घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. शिवसेना अडचणीत येण्याच्या शक्यतेने अखेर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुकांत ऊर्फ भाई सावंत यांचा बॅनरवरील फोटो हटविला. त्या जागी अन्य पदाधिकाऱ्याचा फोटो चिकटवण्यात आला आहे.
आम्ही सगळे कार्यकर्ते शिवसेनेतच आहोत, असे दाखवण्याचा हा शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न आहे; परंतु आम्ही सर्व मंत्री उदय सामंत आणि भैय्या सामंत समर्थक आहोत.
- रोशन फाळके,माजी उपनगराध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.