रत्नागिरी : रस्ता भूमिपूजनप्रसंगी शिवसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 August 2019

मंडणगड - तालुक्‍यातील चिंचघर येथे रस्त्याचे भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांच्या ताफ्याला राष्ट्रवादीतर्फे काळे निशाण दाखविले. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत विरोध केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मंडणगड - तालुक्‍यातील चिंचघर येथे रस्त्याचे भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांच्या ताफ्याला राष्ट्रवादीतर्फे काळे निशाण दाखविले. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत विरोध केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण आटोक्‍यात आणले. यानंतर आमदार संजय कदम मंडणगडात दाखल झाले. त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. 

विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुका अध्यक्ष अनिल रटाटे, उपाध्यक्ष बशीर मसुरकर यांनी जोरदार निषेध केला. चिंचघर-जावळे-आंबवली-साखरी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन करण्यासाठी पालकमंत्री वायकर, रामदास कदम चिंचघर येथे आले. या वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. स्थानिक आमदार संजय कदम यांनी या रस्त्याचे आधीच भूमिपूजन केले असून कामही सुरू झाले आहे, असे राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. आक्रमक झालेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीसह धक्काबुक्की केली. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र या सर्व घटनेमुळे वातावरण तणावग्रस्त बनले. यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. पालकमंत्री वायकर यांनी मी अध्यक्ष असल्यामुळे नियमानुसार याचे भूमिपूजन करीत असल्याचे सांगितले मात्र राजकीय राडा झाला. 

तक्रार दाखल करण्यात येणार 
याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल रटाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करीत असताना सेनेचे कार्यकर्ते अंगावर धावून आले. यात प्रकाश शिगवण यांना मारहाण केली. याबाबत पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. आमदार संजय कदम पोलिस ठाण्यात दाखल झाल्यावर प्रक्रिया सुरू होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri : Shiv Sena - NCP activists quarrel in Chinchghar