
रत्नागिरी : महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढावे ; गिते
रत्नागिरी : माझे मत आहे, की यापुढे शिवसेनेने स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवाव्यात. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरे जावे. मला खात्री आहे, की उभा महाराष्ट्र शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना स्वीकारेल. एकनाथ शिंदे गटाच्या मागणीशी माझ्या मताचा संबंध नाही; पण स्वबळाची मागणी करण्यासाठी बेईमानी, गद्दारी, बापाला नालायक म्हणण्याची गरज आहे का? शिंदे गटाला या विषयावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, असे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी शिंदे गटाला ठणकावले.
रत्नागिरी दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. शिवसेनेत दोन गट पडून अनेकजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असताना उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले माजी खासदार अनंत गीते यांनी स्वबळाबाबत मोठे विधान केले. गीते म्हणाले, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपले मत मांडण्याचा हक्क आहे. तसा माझे मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. यापुढे शिवसेनेने सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात.
महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरे जावे. उभा महाराष्ट्र शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना स्वीकारणार, याचा पूर्ण विश्वास आहे. मी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दौरा करणार याची कल्पना दिली आहे. शिवसेना संकटात असताना पाठीशी राहणे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे.
शिंदे गटाच्या मागणीशी माझ्या मताचा संबंध नाही. स्वबळाची मागणी करण्यासाठी बेईमानी करण्याची गरज आहे का? गद्दारी करण्याची गरज आहे का? बापाला नालायक म्हणण्याची गरज आहे का? आईला विकण्याची गरज आहे का? काही गरज नाही. शिंदे गटाला या विषयावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असेही गीते यांनी ठणकावून सांगितले. गद्दार शब्द लागत असेल तर शिवसैनिक आहोत, हे का सांगावे लागते. शिंदे गटाची आता दखल घेण्याची गरज नाही, अशी पुस्ती त्यानी जोडली.
Web Title: Ratnagiri Shiv Sena Should Fight Own Maharashtra Gita
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..