Ratnagiri Sindhudurg Loksabha 2019 : 65 टक्के मतदान

Ratnagiri Sindhudurg Loksabha 2019 : 65 टक्के मतदान

कणकवली - विद्यमान खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य आज ‘इव्हीएम’मध्ये बंद झाले. सिंधुदुर्गात सुमारे ६८ टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्‍त केला. पूर्ण मतदारसंघात सुमारे ६५ टक्‍के मतदान झाले. 

२०१४ मध्ये जिल्ह्यातील मतदानाची सरासरी टक्‍केवारी ६५ टक्‍के होती. यंदा मतदानात तीन टक्‍के झाली. ही वाढ कुणाच्या पथ्यावर पडते, हे २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीतून उघड होईल. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान सावंतवाडी मतदारसंघात ६९ टक्‍के, तर कुडाळ आणि कणकवली मतदारसंघात सरासरी ६७ टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

एकमेकांचे कार्यकर्ते फोडणे, उमेदवारांवर वैयक्‍तिक टीका, सोशल मीडियावरून प्रतिस्पर्धी उमेदवारांची होणारी प्रचंड बदनामी अशा वातावरणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची निवडणूक गाजली. आज सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झाले. मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत आणि ‘स्वाभिमान’चे नीलेश राणे यांच्यातच प्रमुख लढत होती. आता मतदार नेमका कुणाच्या पारड्यात कौल देतो, हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे. 
श्री. राऊत पुन्हा एकदा दीड ते अडीच लाखांच्या मताधिक्‍याने विजयी होतील, असा दावा शिवसेनेकडून, तर नीलेश राणे ५० ते ६० हजारांचे मताधिक्‍य मिळवतील, असा दावा ‘स्वाभिमान’च्या नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. 

दिवसभर सूर्य तळपत असतानाही मतदारांचा मतदानाचा उत्साह कायम होता. उन्हाच्या झळा टाळण्यासाठी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्‍यात काही ठिकाणी ‘इव्हीएम’ बंद पडण्याच्या घटना वगळता मतदान शांततेत झाले. जिल्ह्यात ९१५, तर मतदारसंघात एक हजार ९४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळी नऊपर्यंत ९.२९ टक्‍के, अकरापर्यंत २१.५९ टक्‍के, दुपारी एकपर्यंत ३५.५९ टक्‍के, तीनपर्यंत ४५.१० टक्‍के, तर सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ६१.११ टक्‍के मतदान झाले होते. शेवटच्या तासात जवळपास सात टक्‍के मतदारांनी मतदान केल्याचा निवडणूक विभागाचा अंदाज आहे. उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी मिळाली नव्हती. 

गेल्या २० दिवसांत दोन्ही जिल्ह्यांत ९० सभा घेतल्या. सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनीही प्रचंड मेहनत घेतली. मागच्या वेळेस दीड लाखाचं मताधिक्‍य मिळालं होतं. यंदा सिंधुदुर्गातून एक लाख आणि रत्नागिरीतून दीड लाख असे एकूण अडीच लाखांचे मताधिक्‍य निश्‍चितपणे मिळेल.’’
- विनायक राऊत, शिवसेना

रत्नागिरीतील अर्धी शिवसेना आम्ही आडवी केली. सिंधुदुर्ग तर आमचे होम पीच आहे. आमच्या सर्वच सभांना जनतेने प्रचंड पाठिंबा दिलाय. नेते नारायण राणे यांच्यावर प्रेम व्यक्‍त केलंय. त्यामुळे आम्ही रत्नागिरी-सिंधुदुर्गात ५० हजारांच्या मताधिक्‍याने निश्‍चितपणे विजयी होऊ.
- नीलेश राणे, स्वाभिमान

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर ३५ ते ४० हजारांच्या मताधिक्‍याने विजयी होतील. आतापर्यंतचा प्रतिसाद पाहता बांदिवडेकर यांनाच मताधिक्‍य मिळण्याचे संकेत आहेत. विजयाची माळ ही बांदिवडेकर यांच्याच गळ्यात पडेल.
- विकास सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

प्रसिद्धीमाध्यमांची मांदियाळी
लोकसभेचे तीन प्रमुख उमेदवार विनायक राऊत, नीलेश राणे आणि नवीनचंद्र बांदिवडेकर हे सिंधुदुर्गातीलच आहेत. याखेरीज मतदानासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे आज दिवसभर कणकवलीत होते. या सर्वांच्या प्रतिक्रिया मिळविण्यासाठी विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी आज कणकवलीत तळ ठोकला होता.

सोशल मीडियावर धुमाकूळ
आय विल व्होट... होय, मी मत दिले... तुम्ही दिले का? अशा असंख्य मेसेजने व्हॉट्‌सॲप आणि फेसबुकवर गर्दी केली होती. प्रामुख्याने नवमतदारांनी मतदान केल्यानंतर बोटाला शाई असलेला आपला फोटो फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावर टाकत लोकशाहीचा उत्सव साजरा केला.

सर्व लोकसभांसाठी हक्‍क बजावणारे
१९५२ ते आजपर्यंतच्या सर्व १७ लोकसभा निवडणुकांसाठी माजी आमदार डॉ. य. बा. दळवी यांनी आज कळसुली येथे मतदान केले. वयाच्या ९४ व्या वर्षीही दांडगा उत्साह असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दळवी यांनी मतदानाचा हक्‍क बजावल्यानंतर आनंद व्यक्‍त केला.

आयकॉन कर्णिक यांचेही मतदान
ज्येष्ठ साहित्यिक आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयकॉन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या करूळ गावी मतदानाचा हक्क सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी बजावला. श्री. कर्णिक यांनी आयोगाचे आयकॉन म्हणून मतदार जनजागृती उपक्रमात सहभाग घेतला होता.

एक नजर
ं* रत्नागिरी-सिंधुदुर्गातील एकूण उमेदवार १२
* मतदान केंद्र संख्या : एकूण १९४२, सिंधुदुर्गात ९१५
* मतदार संख्या- पुरुष- ७,०६,३१८, स्त्री- ७,३५,६०९, एकूण- १४,४१,९३६
* सिंधुदुर्ग मतदार संख्या- ६ लाख ६६ हजार ७२०

२०१४ विधानसभा मतदारसंघवार मतदान
चिपळूण- १,५३,१०७
रत्नागिरी- १,६८,१५१
राजापूर- १,४५,१४४
कणकवली- १,५१,३२१
कुडाळ- १,३३,३०४
सावंतवाडी- १,४४,४८९
-------------
एकूण झालेले मतदान
-------------
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ
वर्ष*टक्केवारी
२००९*५७.३९
२०१४*६५.७२
२०१९*सुमारे ६५
-------------
मतदान केंद्र संख्या ः
सिंधुदुर्ग-रत्नागिरी- १९५२
--------------
दिव्यांग मतदार सुविधा
व्हीलचेअर- २४४

* सिंधुदुर्गात झालेले मतदान (सायंकाळी पाचपर्यंत)
- एकूण मतदार- ६ लाख ६६ हजार ७२०
- झालेले मतदान- ४ लाख ६० हजार ४१२
- पुरुषांचे मतदान- २ लाख ८ हजार ९०५
- महिलांचे मतदान- १ लाख ९८ हजार ५०७
--------------
* सिंधुदुर्गातील मतदानाची विधानसभा मतदारसंघावार टक्‍केवारी (सायंकाळी पाचपर्यंत)
कणकवली- ६०.४४
कुडाळ- ६०.७८ 
सावंतवाडी- ६२.११ 
एकूण- ६१.११
---------------------
* विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान (सायंकाळी ५ पर्यंत)
कणकवली- 
पुरुष- ६९,४५१
महिला- ६९,२६८
---------------------
एकूण- १,३८,७१९
-------------------------
कुडाळ 
पुरुष- ६७,१८१
महिला- ४२,६८५
---------------------
एकूण- १,२९,८६६
------------------------------------------
सावंतवाडी
पुरुष- ७२,२७३
महिला- ६६,५५४
---------------------
एकूण- १,३८,८२७


* १० इव्हीएम मशिनमध्ये बिघाड
* २० कंट्रोल युनिट आणि ४२ व्हीव्हीपॅट नादुरुस्त
* अनेकांची नावे यादीतून गायब
* केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे उकाड्याने हाल
* सायंकाळी सहानंतरही रांगा
* व्हीव्हीपॅटबद्दल कुतूहल
* राऊत, राणे उमेदवारांकडून बूथचा आढावा
* सखी मतदान केंद्रावर महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
* कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com