Amit Shah : असली शिवसेनेचा फैसला होईल

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी येथील जवाहर मैदानावर झालेल्या सभेत गृहमंत्री अमित शहा बोलत होते.
Amit Shah
Amit Shah Sakal

रत्नागिरी - ‘पंतप्रधानांनी जम्मू- काश्मीरमधील ३७० वे कलम हटविल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्याचा लोकांना फायदा नाही असे सांगितले पण त्यांना हे माहीत नाही की काश्मीरसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गातील लोकही आहुती द्यायला तयार होतील. देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्‍या काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना कोकणी जनता कधीच माफ करणार नाही. ही निवडणूक असली शिवसेना कोणती याचा निकाल लावणारी आहे,’’ अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी येथील जवाहर मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. शहा म्हणाले, ‘‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्या रूपाने एक चांगला चेहरा दिला आहे. याच राणेंनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले अनेक दिवस संघर्ष केला आहे.

राणे यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गतील लोकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे.’ ‘काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांनी ३७० वे कलम हटविण्यासाठी विरोध केला. आधी काश्मीरच्या लाल चौकात जाणे अवघड होते, आज तिथे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.

उद्धवजींना विचारू इच्छितो की तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवे आहे की ३७० वे कलम हटविणाऱ्‍याला विरोध करणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे. गेली दहा वर्षे सोनिया-मनमोहन यांची सत्ता होती. पाकिस्तानी लोक देशात घुसत होते. मनमोहनसिंग मौन राखत दिल्लीत बसले होते. त्यांना व्होट बँकेची चिंता होती. त्यांची व्होट बँक कोणती आहे? हे सर्वांना माहिती आहेच.

काँग्रेसची व्होट बँक उद्धव ठाकरेंची झाली आहे,’’ असा आरोप शहा यांनी केला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री उदय सामंत, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार शेखर निकम, आमदार नीतेश राणे, आनंदराव अडसूळ, नीलेश राणे, चित्रा वाघ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री होण्यासाठी हातमिळवणी

‘‘मुख्यमंत्री होण्यासाठीच ठाकरे यांनी काँग्रेस, शरद पवारांशी हातमिळवणी केली. काँग्रेसने राम मंदिराचा प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवून त्यावर मतांचे राजकारण केले. दुसऱ्‍यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींनी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराची केस जिंकून मंदिराची पायाभरणी करत उभारणीही केली. त्यानंतर झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा अख्ख्या जगाने पाहिला.

राम मंदिर उभारण्याची हिंमत फक्त मोदीच करू शकतात. आपल्याला अनेक वर्षांत जे जमले नाही ते मोदी करत असताना केवळ विरोध करण्याचे काम राहुल गांधी व शरद पवार करीत आहेत. दुर्दैवाने त्यांच्या चरणावर उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत,’’ अशी टीकाही शहा यांनी केली.

शिंदे, राणे अन् राज ठाकरे वारसदार

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड, राम मंदिराची निर्मिती, ३७० वे कलम रद्द करणे आणि देशाची सुरक्षा करणे अशी कामे केली. असे असताना सत्ता मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले. अशी व्यक्ती महाराष्ट्राचा गौरव राखू शकत नाही.

तोंडी तलाक, समान नागरी कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ यासह स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यांवर ते भूमिका घेऊ शकत नाहीत. ही शिवसेना नकली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला असला तरी बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि नारायण राणे चालवीत आहेत,’’ असे शहा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com