रत्नागिरी : सहाचाकी वाहनांना आंबा घाटात परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

truck

रत्नागिरी : सहाचाकी वाहनांना आंबा घाटात परवानगी

रत्नागिरी ः भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातून सहाचाकी आणि २० टन वजनी गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दिल्याने वाहतूक सुरू झाली. या संदर्भातील पत्र प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे सुमारे चार महिन्यांनंतर एसटी प्रवाशांसह विविध उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर साखरपा ते आंबा या घाटात जुलैमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे १२ ठिकाणी दरड कोसळल्याने महामार्ग पूर्णपणे बंद झाला होता.

या परिसरात पडलेले मातीचे ढिगारे काढून हलक्या वाहनांना धावण्यास परवानगी दिली गेली. मुख्य दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या मार्गावरून अवजड वाहतूक बंद असल्याने एसटी प्रवासी, कोकणातील शेतकरी, लाकूड व्यापारी, चिरेखाण व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. इंधन, वेळ, पैसा याचा अपव्यय होत होता. पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत सहाचाकी वाहनांची वाहतूक सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार आंबा घाटातील तीन ठिकाणी तात्पुरता वळण रस्ता तयार करण्यात आला. हे काम पूर्ण झाले. ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांनीही पाहणी करून हा मार्ग वाहतुकीला सक्षम असल्याचे पत्र दिले. जास्त वजनाच्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभाग लक्ष ठेवेल; तर महामार्ग पोलिस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवणार आहेत. ‘एनएचआय’कडून पत्र प्राप्त झाल्यावर तत्काळ वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

एसटी प्रवाशांना दिलासा

आंबा घाटातून अवजड वाहतूक बंद केल्याने रत्नागिरीतून कोल्हापूरला जाण्यासाठी एसटीच्या गाड्या अणुस्कुरामार्गे जात होत्या. त्यामुळे प्रवासासाठी अधिक वेळ आणि जादा तिकिटाचा भार सहन करावा लागत होता. सहाचाकी गाड्या सोडण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

"आंबा घाटातून वीस टनापेक्षा अधिक गाड्या जाऊ नयेत, यासाठी वाहतूक पोलिस बंदोबस्त ठेवणार आहेत. घाटावर कोल्हापूरचे, तर साखरपा येथे रत्नागिरी महामार्गाचे पोलिस बंदोबस्तास असतील."

- अमर पाटील, पोलिस निरीक्षक, महामार्ग वाहतूक

loading image
go to top