रत्नागिरी : प्लास्टिकमुक्तीसाठी लोक चळवळ उभारू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिकमुक्तीसाठी

रत्नागिरी : प्लास्टिकमुक्तीसाठी लोक चळवळ उभारू

रत्नागिरी: वृत्तपत्र क्षेत्रामध्ये ‘सकाळ’ने आपला वेगळा दर्जा जपला आहे. प्रबोधनात्मक लिखाणाबरोबर सकाळ अनेक सामाजिक उपक्रमही राबवत असते. रोजच्या जगण्यातील वेगळे विषय आणि युवा पिढीला उद्बोधनात्मक असा मजकूर ‘सकाळ’मध्ये वाचायला मिळतो. सकाळ माध्यम समूहाने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने प्लास्टिकमुक्त रत्नागिरीसाठी व्यापक चळवळ उभी करावी. जिल्हा प्रशासन आपणास सर्वतोपरी सहकार्य करेल व अन्य संस्थांबरोबर जिल्ह्यात प्लास्टिकमुक्तीची चळवळ उभी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी केले.

‘सकाळ’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दीपप्रज्वलन करून त्यांनी ‘सकाळ’चे संस्थापक (कै.) नानासाहेब परुळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. त्यानंतर सकाळच्या ‘आरोग्यम’ पुरवणीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन केले. रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव, जाहिरातप्रमुख दत्तप्रसन्न कुलकर्णी, मुख्य बातमीदार राजेश शेळके, बातमीदार राजेश कळंबटे, वितरण प्रतिनिधी चिनार नार्वेकर, बातमीदार नरेश पांचाळ, मकरंद पटवर्धन, ऑपरेटर मंगेश मोरे आदी होते.

झालेल्या अनौपचारिक गप्पांत पर्यावरणवादी असलेले जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, ‘प्लास्टिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्लास्टिकचे पार्टिकल्स रक्तामध्ये गेल्याने गंभीर आजार होतात. प्लास्टिक एकत्र करण्यासाठी बाजारपेठांमध्ये ठिकठिकाणी कलेक्शन स्पॉट निर्माण करून या प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या मशिन रत्नागिरी शहरात बसवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. श्री. पाटील पुढे म्हणाले, प्लास्टिक कायम स्वरुपी नष्ट करणे शक्य नाही. परंतु त्याचा पुनर्वापर होण्याच्यादृष्टीने प्लास्टिकपासून ऑइलची निर्मिती, ब्रिक्स किंवा टाईल्स बनविणे, डस्टबिन आणि शोभिवंत वस्तू बनविणे असे उपक्रम राबवता येतील. निधीसाठी कमतरता भासणार नाही. सकाळने यात पुढाकार घेऊन जिल्ह्यात ही चळवळ सुरू करावी, असे आवाहन केले.

बॅकवॉटर टुरिझमसाठी पुढे यावे : श्री. पाटील

जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा, यासाठी आमचे कसोसीने प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन विकास महामंडळाकडून त्यासाठी काही कोटीत निधी आला आहे. सिधुरत्न योजनेची जोड त्याला मिळाल्याने टप्प्या-टप्प्याने विकास कामे सुरू केली जाणार आहे. जिल्ह्यातील खाड्यांमध्ये बॅकवॉटर टुरिझम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी हाऊसबोट खरेदी केली जाईल. तसेच स्थानिक कोण यासाठी इच्छुक असतील तर त्यांनीही पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.

‘सकाळ’ जनजागृती मतपरिवर्तन करेल

जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, प्लास्टिकमुक्तीसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. प्लास्टिक विक्रीवर बंदी आणून किंवा दंड करून ही समस्या सुटणार नाही. प्रत्येक रत्नागिरीकराला मी प्लास्टिक वापरणार नाही, असा निश्चय करावा लागेल. प्लास्टिकबंदीचा कार्यक्रम घेऊन प्रतिबंध येणार नाही तर ती एक निरंतर चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे. जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था, विद्यार्थ्यांना घेऊन ही चळवळ आपल्याला उभी करायची आहे. त्यातील जनजागृती आणि मतपरिवर्तन ‘सकाळ’ करू शकेल.

Web Title: Ratnagiri Start People Movement Plastic Release

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top