...अन् कामथे उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांचे बंड शमले; पाचपैकी तिघे हजर  

मुझफ्फर खान
Saturday, 8 August 2020

कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना धमकी दिली जाते.

चिपळूण - कामथे येथील उपजिल्हा रूग्णालयात यापुढे केवळ कोरोनाबाधित रूग्णच दाखल केले जाणार आहेत. इतर आजार असलेल्या रूग्णांना खासगी रूग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय सानप यांनी दिली. 

कामथे उपजिल्हा रूग्णालय कोव्हिड सेंटर असले तरी येथे सर्प, विंचू दंश आणि इतर आजार असलेल्या रूग्णांवरही उपचार केले जात होते. कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले जाते. येथे दाखल होणार्‍या रूग्णांच्या नातेवाईकांबरोबर डॉक्टरांचे खटके उडत असल्यामुळे काही डॉक्टर तणावाखाली होते. मध्यंतरी 80 कोरोनाबाधित रूग्ण दाखल होते. तेव्हा आमच्या रूग्णांना चांगली सेवा मिळत नाही असा आरोप करत काही नातेवाईकांनी डॉक्टरांना दमदाटी केली होती. त्यामुळे काही डॉक्टर रजेवर तर काहींनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेवून डॉक्टरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. रूग्णालयात एकूण 10 डॉक्टर्स होते. त्यापैकी पाच जण वेगवेगळ्या कारणांनी गैरहजर आहेत. पाच डॉक्टरांना उपजिल्हा रूग्णालयाचा कारभार संभाळताना तारेवरची कसरत करावी लागत होती. आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकार्‍यांनी मध्यस्ती करून डॉक्टरांची समजूत काढली. त्यामुळे 5 पैकी 3 डॉक्टर हजर झाले आहेत.

कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना धमकी दिली जाते. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी त्यावर उपायोजना करताना अतिरिक्त पोलिस रूग्णालय परिसरात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दोन पोलिस कर्मचारी रूग्णालयाच्या बाहेर सेवा देत होते. त्याठिकाणी पाच पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

हे पण वाचा रत्नागिरीतील हा तालुका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट  

रत्नागिरी येथील जिल्हा रूग्णालयात केवळ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार केले जातात. त्याचप्रमाणे कामथे उपजिल्हा रूग्णालयातही केवळ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. इतर आजार असलेल्या रूग्णांना खासगी रूग्णालयात पाठविले जाणार आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची चांगली सेवा करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

-डॉ. अजय सानप, वैद्यकीय अधिकारी कामथे उपजिल्हा रूग्णालय

 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri sub district hospital will treat only coronary arthritis patients