Ratnagiri Dam Mishap : 16 जणांचे मृतदेह हाती; शोधकार्य सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

काय घडले?

  •  मोठा आवाज होत धरण रात्री ९.३० वाजता फुटले
  •  १० ते ११ कि.मी.पर्यंत विध्वंस
  •  पाच पुलांवरून पाणी गेले
  •  एक कॉजवे, दोन साकव वाहून गेले
  •  एनडीआरएफ पथकाकडून शोधकार्य सुरू

चिपळूण - सह्याद्रीच्या कुशीत झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने आधीच कमकुवत झालेले तिवरे धरण (ता. चिपळूण) मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुटले. पाण्याच्या लोंढ्यामध्ये धरणाखालील वाडीमधील 24 जण वाहून गेले. १२ घरे जमीनदोस्त झाली. त्यापैकी 16 जणांचे मृतदेह दिवसभरात शोधमोहिमेमध्ये सापडले आहेत. त्यांच्यावर गावात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्यापही 8 जण बेपत्ता आहेत. त्यांची शोध मोहिम आज सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून येथील ग्रामस्थ अद्यापही भीतीमधून सावरलेले नाहीत. गावाला स्मशानकळा आली आहे.

दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री रवींद्र वायकर सायंकाळी पाच वाजता घटनास्थळी दाखल झाले. धरण फुटीची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नुकसानीचा नेमका अंदाज प्रशासनाला देता आलेला नाही. वाचलेल्या २६ जणांचे स्थलांतर सध्या गावातील एका शाळेत करण्यात आले आहे. तर बाळकृष्ण चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले आहे.

तिवरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५० टक्‍क्‍यांहून अधिक गाळ साचला होता. अतिवृष्टीनंतर मंगळवारी सायंकाळी धरण जलदगतीने ओव्हर फ्लो झाले. धरणाच्या पश्‍चिम दिशेल्या ज्या ठिकाणी गळती होती, तेथूनच धरण फुटले आणि रात्री पाण्याचा लोंढा बाहेर पडला. तो सुमारे ३० फूट उंचीचा होता.

वाटेवरील घरे, मंदिर, विजेचे खांब जमीनदोस्त करीत लोंढा दहा किलोमीटरपर्यंत नुकसान करीत गेला. अनेक ठिकाणी पाण्याने प्रवाह बदलला. त्यामुळे वाटेवरील पाच पुलांवर पाणी आले होते. भेंदवाडी आणि फणसवाडी यांना जोडणारा कॉजवे वाहून गेला. तेथून दोन मैलांवरील दोन साकव पूर्णपणे नष्ट झाले. यासह शेतीतही गाळ गेला. २० किलोमीटरच्या मार्गातील पुलांची उंची सुमारे १२ ते १३ फुटांपेक्षा अधिक आहे. पुलांवरून पाणी गेले. याचा अर्थ पाण्याचा लोंढा एवढ्या दूरवर इतका उंच होता. आपल्या विध्वंसाच्या खुणा मागे ठेवून लोंढा गेला.

धरण फुटल्यानंतर रात्री दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे चिपळूणचा आकले, रिक्‍टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला होता. सकाळी पाणी ओसरल्यानंतर धरणाने विध्वंस केलेली परिस्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. धरण फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळपासूनच तिवरेकडे अनेकांनी धाव घेतली. त्यामुळे तेथे गर्दीही बरीच झाली होती. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागली. 

घरे गाळात बुजली
तिवरे धरणातील पाण्याच्या लोंढ्यात २३ जण वाहून गेले. मंगळवारी रात्री दीडपर्यंत यातील दोन मृतदेह भेंदवाडीजवळच आढळून आले. इतर ११ जणांचे मृतदेह बौद्धवाडी व तिवरे हायस्कूल समोरच्या नदीत आढळून आले. आज सकाळपासून नदीकाठच्या गावातील लोकांनी नदीकाठी मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले होते; मात्र तेथे मृतदेह आढळले नाहीत. जोथ्यासह घरे वाहून गेली आहेत. ही घरे गाळात बुजली देखील आहेत. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या.

हे अद्यापही बेपत्ता

अनंत हरिभाऊ चव्हाण (वय ६३), अनिता अनंत चव्हाण (५८), रणजित अनंत चव्हाण (१५), ऋतुजा अनंत चव्हाण (२५), दुर्वा रणजित चव्हाण (१५), आत्माराम धोंडू चव्हाण (७५), लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२), नंदाराम महादेव चव्हाण (६५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५०), रवींद्र तुकाराम चव्हाण (५०), रेश्‍मा रवींद्र चव्हाण (४५), दशरथ रवींद्र चव्हाण (२०), वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८), अनुसया सीताराम चव्हाण (७०), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५), शारदा बळीराम चव्हाण (४८), संदेश विश्वास धाडवे (१८), सुशील विश्वास धाडवे (४८), रणजित काजवे (३०), राकेश घाणेकर (३०)

काय घडले?

  •  मोठा आवाज होत धरण रात्री ९.३० वाजता फुटले
  •  १० ते ११ कि.मी.पर्यंत विध्वंस
  •  पाच पुलांवरून पाणी गेले
  •  एक कॉजवे, दोन साकव वाहून गेले
  •  एनडीआरएफ पथकाकडून शोधकार्य सुरू

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Tivare Dam Mishap 14 dead bodies recovered