
रत्नागिरी : पाणीपुरीवाल्याकडून पर्यटकांना मारहाण
रत्नागिरी : शहरातील मांडवी येथील किनारी पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबीयांना पाणीपुरी-भेळवाल्याकडून मारहाण करण्यात आली. तसेच चाकू काढून धमकी देण्यात आली. मारहाणीत जखमी झालेली महिला व तिच्या मुलाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रियांक सचिन जाधव (वय १५ ) व सौ. प्रतीक्षा सचिन जाधव (वय ३०) अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन जाधव (वय३९, रा. नालासोपारा-मुंबई, मूळ ः काटवली देवरूख, ता. संगमेश्वर) व त्यांची पत्नी मांडवी किनारी मुलांना घेऊन फिरण्यासाठी आली होती. त्यांच्यासोबत प्रियांक व यश नीलेश जाधव, पियूष सचिन जाधव व क्षितिज अभिजित जाधव अशी मुले होती. सचिन जाधव हे मांडवी येथील रत्नागिरी गेट येथे फिरत असताना त्यांची पत्नी व मुलगा प्रियांक हे मांडवी येथे किनाऱ्यावरील पाणीपुरी खाण्यासाठी गेले होते.
मुलांनी पाणीपुरी घेतल्यानंतर ती थोडी आंबट असल्याचा दावा केल्यावर त्याचा राग मनात धरून तेथील पाणीपुरी विक्रेत्या मुलाने प्रियांक याला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी सचिन यांची पत्नी प्रतीक्षा जाधव या सोडविण्यासाठी गेल्या असताना पाणीपुरी विक्रेत्याने सुरी काढून धाक दाखविला. हे प्रकरणी तिथेच थांबले नाही, त्यानंतर पाणीपुरी विक्रेत्या मुलाच्या वडिलांनी येऊन प्रतीक्षा जाधव व प्रियांक यांना मारहाण केली. गोंधळ झाला असल्याचे सचिन जाधव यांच्या लक्षात येताच ते लागलीच तेथे आले व मारहाणीतून पत्नी व मुलाला बाहेर काढले व सर्व उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत; मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीचा दरवाजा बंद असल्याने सायंकाळी सहा वाजेपर्यत कुणीही दखल घेतली नाही. उपचार झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात जाऊन मांडवी येथील पाणीपुरीवाल्याविरुद्ध तक्रार देणार असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले.
Web Title: Ratnagiri Tourists Beaten Panipuriwala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..