विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांना थारा देऊ नका : रविंद्र चव्हाण

अमित गवळे
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

केवळ निवडणुकात विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी विविध पक्ष पुढे येतात. जनतेने कुणाच्याही भुलथापांना बळी न पडता विकासकामे करणाऱ्या भाजप-शिवसेना- रिपाइंलाच भक्कमपणे साथ देऊन देशाच्या विकासाला गती व चालना द्यावी.

पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील विविध विकासकामांचे भुमिपूजन व उद्घाटन मंगळवारी (ता.१९) पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी मंत्री रवि पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सुधागड तालुक्यातील सत्ताधारी पक्षावर टीका केली. यावेळी रविद्र चव्हाण म्हणाले, मागील 10 वर्षे सुधागड तालुका विकासापासून वंचित ठेवणाऱ्या व केवळ थापा मारणाऱ्यांना आता थारा देऊ नका.

तसेच ते म्हणाले, केवळ निवडणुकात विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी विविध पक्ष पुढे येतात. जनतेने कुणाच्याही भुलथापांना बळी न पडता विकासकामे करणाऱ्या भाजप-शिवसेना- रिपाइंलाच भक्कमपणे साथ देऊन देशाच्या विकासाला गती व चालना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.

छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुधागड तालुक्यातील भेलीव पुलाचे भूमीपूजन, भालगुल फाटा कान्हिवली वांद्रोशी रस्ता भूमिपूजन, ताडगाव खेमवाडी घोडगाव रस्ता उद्घाटन, उध्दर अंतर्गत रस्ता भूमिपूजन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार म्हणून सधी द्या. भाजपच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची गंगा आणणार असल्याची ग्वाही रवि पाटील यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमात युवा नेते वैकुंठ पाटील, जि.प सदस्य रविंद्र देशमुख, भा.ज.प जिल्हा सरचिटणीस सुनिल दांडेकर, भा.ज.प जिल्हा चिटणीस राजेश मपारा, सुधागड तालुका भा.ज.प अध्यक्ष राजेंद्र राऊत, मराठा सुराज्य संघाचे अध्यक्ष प्रणय सावंत, माजी उपसभापती वि.बी.पाटील, वासुदेव म्हात्रे, अभिजीत पाटील, प्रकाश पाटील, श्रीकांत पाटील, गणपत दळवी, जांभुळपाडा सरपंच श्रध्दा कानडे, चंद्रकांत घोसाळकर, गणेश कानडे, शिरिष सकपाळ, रविंद्र खंडागळे, निखिल शहा आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravindra Chavan Criticizes about Deprived Issue