...अन् रयत क्रांती संघटनेने थेट शेतातूनच केले आंदोनल  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

कोकणामध्ये रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांसमवेत थेट शेतामध्ये जावून शेतकरी बचावाचा एल्गार पुकारला.  

राजापूर - वाढत्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची महामारीमध्ये जगाच्या पोशिंद्याची (शेतकर्‍याची) विविध समस्यांमुळे चांगलीच ससेहोलपट झाली आहे. शेतकर्‍यांच्या या प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेने आज राज्याच्या विविध भागांमध्ये राज्यव्यापी आंदोलन छेडले. त्यामध्ये कोकणामध्ये रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांसमवेत थेट शेतामध्ये जावून शेतकरी बचावाचा एल्गार पुकारला.  

तालुक्यातील तुळसवडे येथे शेतामध्ये जावून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांसमवेत छेडलेल्या आंदोलनामध्ये  रयत क्रांती संघटनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा सोशल मीडिया सेलप्रमुख शैलैश पांचाळ, तुळसवडेचे माजी सरपंच संजय कपाळे, शितल कपाळे, विलास कपाळे, मनोहर आडीवरेकर, रुपेश आडीवरेकर, प्रणय कपाळे, बाबा आडीवरेकर, प्रकाश सुतार, भिकाजी सुतार, योगेश सुतार, अमोल आडीवरेकर, बापू आडीवरेकर, एकनाथ शिवगण, दिवाकर आडीवरेकर, किशोर गराटे, चंदन पांचाळ आदींसह अनेक शेतकरी बांधव सहभागी झाले होते. सोशल डिस्टन्स राखून आणि मास्क वापरून हे आंदोलन छेडले.

कोरोनाच्या अनुषंगाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांवर उपासमार आणि बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. अशा स्थितीमध्ये शेतकरी मात्र, स्वतःचे प्रश्‍न वा समस्यांकडे दुर्लक्ष करून लोकांचे उदरभरण करण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहेत. असे असले तरी, शेतकर्‍याच्या प्रश्‍नांकडे मात्र, शासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे जगाच्या भल्यासाठी राबणार्‍या शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री श्री. खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेने कंबर कसली आहे. त्यासाठी आज राज्यभर शेतकर्‍यांसमवेत शेतकरी बचाव आंदोलन छेडण्यात आले. त्यामध्ये कोकणातील शेतकर्‍यांचाही समावेश आहे.  

हे पण वाचा - वेध गणेशोत्सवाचे :  कोकणात गावागावांची भूमिका ; क्वारंटाईन व्हा, मगच गावात मिसळा...  

शेतकर्‍यांसाठी या आहेत रयत क्रांती संघटनेच्या मागण्या

रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकर्‍यांसाठी छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, गाईच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर बाजार भाव मिळावा, बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेती पिकाचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी, चक्रीवादळामुळे कोकणातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन आपद्ग्रस्तांना त्वरीत मदत करावी, प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणि हवामान आधारीत फळपिक विमा योजना या बॅकांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकर्‍यांपर्यत पोचत नाहीत त्यांच्यावर कार्यवाही करावी आदी विविध मागण्या केल्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rayat kranti sanghatana protest in rajapur