काय घडले गोवा-महाराष्ट्र सीमा परिषदेत वाचा................

Read what happened at Goa-Maharashtra Border Council
Read what happened at Goa-Maharashtra Border Council

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रातून गोव्यात जाणाऱ्या वाहनांची गोवा नाक्‍यावर तर गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची तपासणी महाराष्ट्र नाक्‍यावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र-गोव्याच्या सीमा परिषदेत झाला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व गोवा राज्याचे प्रधान सचिव पुनीत गोयल यांच्या समन्वयातून हा निर्णय जाहीर केला. आता दोन्ही चेकपोस्टवर तपासणीमुळे होणारा खोळंबा टळणार आहे. गोव्यात जाणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी वेळ लागत असल्याने महाराष्ट्र हद्दीत सुमारे तीन किलोमीटरपर्यंत म्हणजे अगदी बांदा शहरापर्यंत रांगा लागत होत्या. याबाबत `सकाळ' ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तोडगा निघाला. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सीमेवर पत्रादेवी येथे गोव्याच्या तपासणीमुळे बांद्याच्या दिशेने लांबच लांब रांगा लागत होत्या. संबंधित वाहनांचे परजिल्ह्यातील चालक नाश्‍त्यासाठी बांदा बाजारपेठेत येत होते. परराज्यातील वाहनचालक रेड झोनमधून प्रवास करून येत असल्याने नागरिकांच्या संतप्त भावना होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. येथील सुशांत पांगम यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. 

दोन्ही तपासणी नाक्‍यांवर सकाळी के. मंजुलक्ष्मी यांनी भेट दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, गोव्याचे प्रधान सचिव पुनीत गोयल, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, गोवा पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, पेडण्याचे निरीक्षक संदेश चोडणकर, सावंतवाडीचे प्रांत सुशांत खांडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मोटर वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील, बांदा निरीक्षक अनिल जाधव उपस्थित होते. 

सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांत अडीच तास चर्चा झाली. चर्चेअंती महाराष्ट्रातून गोव्यात जाणाऱ्या वाहनांची केवळ गोवा नाक्‍यावर, तर गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची महाराष्ट्र नाक्‍यावर तपासणी करण्याचे मान्य केले. त्यामुळे दोन्ही नाक्‍यांवरील तपासणीचा प्रत्येकी एक नाका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तत्काळ बंद करण्यात आला. तपासणी प्रक्रिया जलद होण्यासाठी पत्रादेवी (गोवा) येथे अतिरिक्त काऊंटर सुरु करण्याचे निर्देश प्रधान सचिव गोयल यांनी दिले. चर्चेत गोव्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती वाहनांना प्रवेश देण्यात आला, त्याच्या दैनंदिन माहितीचे आदानप्रदान करण्याचा निर्णय झाला. दरदिवशी सायंकाळी उशिरा सिंधुदुर्ग व गोवा पोलिसांकडे ही माहिती मिळणार आहे. 

तीच रुग्णवाहिका पुढे सोडणार 
यावेळी सुशांत पांगम, गजानन गायतोंडे, राजेश विरनोडकर, देवा कुबल यांनी वाहनधारकांच्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. गोवा-बांबोळी रुग्णालयात रुग्णांना नेताना चेकपोस्टवर होणारी वाताहत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. अत्यवस्थ स्थितीत रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना सीमेवर थांबविण्यात येते. त्यानंतर गोवा हद्दीतील रुग्णवाहिकेतून रुग्णाला बांबोळीत नेण्यात येते. या प्रक्रियेसाठी कालावधी होत असल्याने गंभीर रुग्ण दगावण्याची शक्‍यता आहे. किरकोळ तपासणीनंतर तीच रुग्णवाहिका पुढे सोडण्याबाबतचे निर्देश के. मंजुलक्ष्मी यांनी गोवा प्रशासनाला दिले. गोवा शासनानेही ही मागणी मान्य केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com