esakal | रत्नागिरीत तीन दिवसांसाठी रेड अलर्ट ; किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain

रत्नागिरीत तीन दिवसांसाठी रेड अलर्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवितानाच रेड अलर्ट (red alert) जाहीर केला आहे. सलग तिसऱ्‍या दिवशीही पावसाने जिल्ह्याला झोडपले. भारजा, जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, काजळीसह अर्जुना नद्या पात्र सोडून वाहत असल्याने किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरस्थिती नसल्यामुळे जनजीवन सुरळीत झाले आहे. राजापुरातील पूर ओसरला असला तरीही पुराची टांगती तलवार कायम आहे.

जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी १३०.२६ मि.मी. पाऊस झाला. त्यात मंडणगड २१५.१०, दापोली ९४.३०, खेड ४६.५०, गुहागर १३५.६०, चिपळूण १०२.५०, संगमेश्वर १४५, रत्नागिरी १६२.९०, राजापूर १२८.७०, लांजा १४१.७० मि.मी. नोंद झाली. सवाधिक पावसाची नोंद झालेल्या मंडणगडात अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे किनारी भाग जलमय झाले आहेत. तेथील परिस्थिती आटोक्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला. पुराचे पाणी ओसरल्याने संपर्क तुटलेल्या राजापूर, मंडणगड, खेड तालुक्यातील गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. रत्नागिरी तालुक्यात दुपारपर्यंत पाऊस सुरू होता. सायंकाळी विश्रांती घेतली. काजळी नदीची पाणीपातळी धोक्याच्या इशाऱ्‍यापर्यंत स्थिरावली आहे. चिपळूण, खेडमध्येही अनुक्रमे वाशिष्ठी, जगबुडी नद्यांचे पाणी पातळीपर्यंत आले.

हेही वाचा- केसरकरांना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना जनताच संपवेल

ठिकठिकाणी पडझड, मालमत्तेची हानी

पावसामुळे मंडणगड तालुक्यात अडखळ येथील बंडू यशवंत हिलम यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ४७ हजार ९०० रुपयांचे, दापोली भडवळेतील ओंकार रामचंद्र खरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २५ हजार रुपयांचे, चिपळूण कापसाळ येथील सुरेखा सुरेश साळवी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ६ हजार रुपयांचे नुकसान झाले. गुहागर पडवे येथे तीन गुरांचे १ लाख ५० हजारांचे नुकसान, संगमेश्वर कोळंबेतील बंडू लिगांयत यांच्या पडवीचे पावसामुळे अशंत: ३० हजार रुपये, पाटगाव येथील रामचंद्र सोनू पागार यांच्या विहिरीचे ४० हजाराचे नुकसान झाले. राजापूर तळवडेतील बाबाजी गोरे यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अंशत: नुकसान झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

loading image