कोकणपट्ट्यात मंगळवारी रेड अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

शिवप्रसाद देसाई
Tuesday, 22 September 2020

रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारी दुपारीपर्यंत उसंत घेतली नव्हती. 

सावंतवाडी : पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अतिवृष्टीची शक्‍यता आहे. या तिन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सावंतवाडी शहरात सोमवारी घुसले पाणी
जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस झाला; मात्र याचा जोर वेंगुर्ले, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात तसेच कुडाळमधील माणगाव खोऱ्यात जास्त होता. यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. कमी उंचीच्या पुलांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती. सावंतवाडी शहरातही पाणी घुसले. 

रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी दुपारपर्यंत संततधार कायम ठेवली. यामुळे जिल्हावासीयांना पुन्हा एकदा पूरस्थितीचा सामना करावा लागला. कणकवली, देवगड, वैभववाडी या भागात पावसाने पाठ फिरवली. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ तालुक्‍यातील माणगाव खोरे, वेंगुर्ले या भागात कोसळलेल्या पावसाने किरकोळ पडझड झाली. नदीकाठची भात शेती पाण्याखाली गेली. सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत पाणी घुसले. काही दुकानांचे नुकसान झाले. मोती तलावही तुडुंब भरल्याने पालिकेला सांडव्याचे गेट खोलून पाणी सोडण्याची वेळ आली. शहरातील इतर भागातही पाणी साचले होते. काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली. ओटवणे, बांदा, शेर्ले गावातील भातशेती पाण्याखाली गेली. ती कुजण्याची भीती आहे. 

वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्‍यात झाली अतिवृष्टी 
वेंगुर्ले तालुक्‍यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. छोट्या छोट्या पुलांवर पाणी आल्याने मार्ग ठप्प होते. तळवडा-होडावडा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भात कापणीच्या तोंडावर पावसाने जोर धरल्याने भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. दोडामार्ग तालुक्‍यातही पावसाने जोर धरला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागात लहान- लहान पुलांवर पाणी आल्याने काही मार्गही ठप्प झाले आहेत. या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज दुपारपर्यंत पावसाची संततधार कायम राहिल्याने ठिकठिकाणी परिस्थिती कायम होती. काही भागातील एसटीच्या फेऱ्याही रद्द केल्या होत्या. 

माणगाव खोऱ्यातही धुवॉंधार
माणगाव खोऱ्यातील आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या भागात जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. वाहतूकही खोळंबली होती. सायंकाळी उशिरा पाणी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red alert in Konkan today; possibility of torrential rains