"रिफायनरी'बाबत प्रमोद जठारांकडून शिवसेना लक्ष्य, म्हणाले...

राजेश सरकारे
Tuesday, 4 August 2020

शिवसेना आणि खासदार राऊत यांना इथे रोजगार निर्माण करायचे नाहीत असेच दिसून येते, अशी टीका भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केली आहे. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा, आणि दुसरीकडे त्याच रिफायनरी कंपनीकडून पैसे घेऊन जाहिराती छापायच्या असा दुटप्पी खेळ शिवसेनेकडून सुरू आहे. कोरोना महामारीत कोकणातील हजारो युवक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासाठी रिफायनरी प्रकल्प ही सुवर्णसंधी आहे; पण शिवसेना आणि खासदार राऊत यांना इथे रोजगार निर्माण करायचे नाहीत असेच दिसून येते, अशी टीका भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केली आहे. 

श्री.जठार म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाबाबत खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेची मंडळी डबलगेम खेळत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्थानिकांना प्रकल्प हवा असेल तर त्याला आमचा विरोध नसेल अशी भूमिका घेत आहेत. या उलट नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांना चप्पलांनी बडवुन काढण्याची धमकी खासदार राऊत देत आहेत. एवढेच नव्हे तर नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांना पक्षातून निलंबित केले जात आहे. 

जठार म्हणाले, शिवसैनिक म्हणजे स्थानिक जनता नव्हे का? शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यानी एमआयडीसीच्या माध्यमातून जागा खरेदीची अधिसूचना काढली. तत्पूर्वी आपल्याच बगलबच्चांना तिथल्या जागा विकत घ्या, असे सांगण्यात आले;

मात्र आज ही मंडळी रिफायनरीला समर्थन करत असल्याचे राऊतांकडून त्यांना दलाल असे संबोधले जात आहे. विरोधासाठी विरोध म्हणून चक्‍क दीड लाख रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगालाच विरोध करणे म्हणजे पुढील अनेक पिढयांचे नुकसान करण्यासारखे आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राऊतांनी आपण कोकणचा लोकप्रतिनिधी म्हणवून घेणे खरोखरच शोभते का? हे आधी स्वतःच्या मनाला विचारावे. 

खासदारांना आव्हान 
सत्तर गावांची देवगड पंचायत समिती पाठिंब्याचा ठराव पास करते, तर खासदार महोदय लोकमताचा आदर करण्याऐवजी एका गावातील छोट्या वाडीत जाऊन मुठभर लोकांना प्रकल्पाविरोधात भडकवत फिरत आहेत. राऊत यांना रोजगार देणारा उद्योग नको असेल तर त्यांनी ताबडतोब खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन "नाणार'ला स्थानिकांचा पाठिंबा आहे की नाही, ते पहावे, असेही आव्हान श्री. जठार यांनी दिले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: refinery project issue statement pramod jathar