काही सुखद ! विद्यार्थ्यांनी बनवली रिमोट कंट्रोल्ड कार्ट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

विलगीकरण केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णाची देखरेख करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र रुग्णांशी येणारा थेट संपर्क त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा आहे.

साडवली ( रत्नागिरी ) - विलगीकरण केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णाची देखरेख करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र रुग्णांशी येणारा थेट संपर्क त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा आहे. हे लक्षात घेऊन आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ब्लूटूथद्वारा नियंत्रित कार्टची निर्मिती केली. ही कार्ट संगमेश्‍वर तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. 

ही एक बॅटरीवर चालणारी कार्ट असून त्याद्वारे 10 मीटरपर्यंत आणि जवळपास 90 किलोपर्यंतच्या वजनाची सामुग्रीची ने-आण करणे शक्‍य होते. रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या या कार्टचा रुग्णांना अन्न व औषधी देण्याचे काम करताना प्रत्यक्ष वापर करता येऊ शकेल व त्यायोगे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क टाळून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता लाभेल. महाविद्यालयाच्या प्रा. इसाक शिकलगार आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रतिक महाडिक यांनी ही कार्ट तयार केली आहे. 

संगमेश्वर तालुक्‍यातील साडवली येथील स्व. मीनाताई ठाकरे हायस्कूल व अन्य ठिकाणी विलगीकरण केद्र स्थापन केली आहेत. या केंद्रावर हे कार्ट वापरण्यात येणार आहे. संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा नेहा माने यांनी ही कार्ट तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी विस्तार अधिकारी आर. एम. दारोकार, पोलिस निरीक्षक निशा जाधव, प्रद्युम्न माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, पद्मनाभ शेलार आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remote Controlled Cart Made By Mane College Of Engineering Students