कलेला सलाम! हुबेहुब साकारला प्रतापगड 

भूषण आरोसकर
Thursday, 19 November 2020

या प्रतापगडच्या प्रतिकृतीमध्ये प्रतापगडवर पोहोचण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारापासून प्रतापगडावर असलेले विविध नावारूपास आलेले ठिकाणे, मंदिरे, बुरुज, तटबंदी दरवाजे, तोफखाने गडाचा आजूबाजूचा परिसर या सर्वांची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दिवाळी सणाला लहान मुले, हौशी तरूण वर्ग विविध प्रकारचे गड-किल्ले बनवितात. साधारणतः बरेचशे गड किल्ले काल्पनिक स्वरूपाचे बनवले जातात; मात्र आकर्षणाचा विषय ठरतो तो हुबेहूब गड-किल्ल्यांची प्रतिकृती. असाच हुबेहूब जिवंत वाटणारा प्रतापगड साकारण्याचे काम सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर त्यांच्या पत्नी सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव, त्यांचा लहान मुलगा पृथ्विराज, नातेवाईक प्रणव यांनी केले आहे. 

येथील माजगाव सीमेवरच श्री. बाबर यांनी घरासमोर प्रतापगडची सुमारे तीन ते चार फूट उंचीची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. या प्रतापगडच्या प्रतिकृतीमध्ये प्रतापगडवर पोहोचण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारापासून प्रतापगडावर असलेले विविध नावारूपास आलेले ठिकाणे, मंदिरे, बुरुज, तटबंदी दरवाजे, तोफखाने गडाचा आजूबाजूचा परिसर या सर्वांची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. 

गडामध्ये असलेले चिलखती बुरुज, त्याशेजारी शिवरायांचे श्रद्धास्थान असलेले अष्टभुजा भवानी मातेचे आकर्षक मंदिर, मंदिराच्या शेजारी असलेला भवानी बुरूज तेथेच किल्ल्याच्या बांधणीसाठी खोदकाम करत असताना निर्माण केलेला तलाव, शेजारी असलेल्या बालेकिल्ला त्याच्या शेजारी असलेले समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर, प्रवेशद्वारातून आल्यावर समोरच दिसणारे आकर्षक केदारेश्वराचे मंदिर आणि त्या जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला अश्‍वारूढ पुतळा, नगारखाना, किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर असलेला टेहळणी बुरुज म्हणजेच शिवप्रताप बुरुज, या बुरुजाच्या पायथ्याशी त्याच्या शेजारी अफजल खानच्या भेटीसाठी छत्रपतींनी ज्या ठिकाणी शामियाना उभारला होता ती जागा, शिवप्रताप बुरूज, जावळीच्या जंगलात असलेल्या सैनिकांना सतर्क करण्यासाठी वाजविलेल्या तोफांची जागा असे अतिशय सूक्ष्म नियोजन करून या प्रतापगड किल्ल्याची निर्मिती केल्याचे बाबर कुटुंबिय म्हणाले. श्री.बाबर यांनी यापूर्वीही अनेक गड किल्ल्यांच्या प्रतिकृती हुबेहूब बनविण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने गाजलेला प्रतापगड किल्ल्याला पाच वेळा भेट दिली आहे. शिवरायांच्या पराक्रमातून गाजलेल्या या किल्ल्यातून मोठी प्रेरणा मिळते. याच प्रेरणेतून मी या किल्ल्याची मोठी व हुबेहूब प्रतिकृती सादर करण्याचा हा प्रयत्न केला आहे. 
- अण्णासो बाबर, सहाय्यक पोलिस निरीक्षक 

 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Replica of Pratapgad at Banda