सीआरझेड सुनावणीत हरकती नोंदवा ः संग्राम प्रभुगावकर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

शासनामार्फत सिंधुदुर्ग सीआरझेड बाधित पाच तालुक्‍यातील जनसुनावणी उद्या सकाळी 11 वाजता कुडाळ, मालवण, देवगड, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुका पंचायत समिती सभागृहात तसेच ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

मालवण (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील सीआरझेड निश्‍चितीबाबतची ई सुनावणी उद्या (ता. 28) होत आहे; मात्र सर्वेक्षण नकाशात अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. त्यासाठी खाडी लगतच्या व अन्य क्षेत्रातील गावांमधून जागरूक होऊन हरकती नोंदवणे आवश्‍यक आहे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी केले आहे. 

शासनामार्फत सिंधुदुर्ग सीआरझेड बाधित पाच तालुक्‍यातील जनसुनावणी उद्या सकाळी 11 वाजता कुडाळ, मालवण, देवगड, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुका पंचायत समिती सभागृहात तसेच ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन स्वरूपात ही सुनावणी होणार आहे. यात बाधित तालुक्‍यातील ग्रामस्थांनी सहभागी होऊन हरकती नोंदवणे गरजेचे असल्याचे प्रभुगावकर यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ""सीआरझेड नकाशामध्ये दर्शवलेले सर्वे नंबर चुकीचे आहेत. महसुली गावांची नावे चुकीच्या ठिकाणी व परत परत आलेली आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होणारे ओढे ज्यात गोडे पाणी वाहते. उन्हाळ्यात ओढे सुके असतात ते ओढे खाऱ्या पाण्याचे दाखवले आहेत. काही ठिकाणी गुगल नकाशामुळे भातशेती, माडबाग, गोड्या पाण्यातील झाडे कांदळवन दाखवले आहे. काही ठिकाणी भात शेतीत खार जमीन दाखवली आहे. तरी हरकत नोंदवताना ठळकपणे विषय मांडावा. उच्चतम भरती रेषा, कांदळवन, घर, मंदिर, प्रार्थनास्थळ याबाबत स्पष्ट उल्लेख करावा. नकाशात दर्शविलेल्या चिन्हानुसार काय दर्शवले ते पाहून हरकत नोंदवावी.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report Objections To CRZ Hearing Sangram Prabhugaonkar Comment