ग्रामस्थांच्या एकीने सुटला 'हा' मोठा प्रश्न....

Representation Of The Madhliwadi People Successful Water Plane Kokan Marathi News
Representation Of The Madhliwadi People Successful Water Plane Kokan Marathi News

कोलझर (सिंधुदूर्ग) : येथील मधलीवाडी भागातील पाण्याचे स्वप्न तब्बल तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर साकारले आहे. मे मध्ये झाडेपेडे सोडाच माणसांनाही पिण्याच्या पाण्यासाठी तळमळावे लागत होते. आता येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारा साकारला आहे. त्यात पाणी साठवणीस प्रारंभ झाला असून हा बंधारा आज ओव्हरफ्लो झाला. 

कोलझर म्हणजे चारही बाजूंनी नद्या असलेले गाव. असे असूनही अती उपशामुळे येथील मधलीवाडी भागात मे मध्ये नदी पात्र आटत असे. येथील पिण्याच्या व बागायतीच्या पाण्याची व्यवस्था खाजगी विहीरींवर अवलंबून आहे. नदीपात्र आटल्यानंतर येथील विहीरी सुकून जायच्या. यामुळे मेमध्ये या भागात राहणेही कठीण जायचे. पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. 

कोल्हापूर टाईप बंधारा उभारला

2015 मध्ये वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत हा पाणी प्रश्‍न सोडवण्याचा निर्धार केला. नेमके या भागात नदीपात्र मोठे आहे; मात्र ही नदी 'नोटीफाईड' नसल्याने राज्यशासनाच्या जलसंधारण किंवा इतर विभागाकडून पाणी योजना होणे कठीण होते. यामुळे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे मागणी करण्याचे ठरले. याला तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी समर्थ साथ दिली. त्यांनी स्वतः जिल्हा संधारण अधिकारी सुनिल काळे यांच्या समवेत पाहणी केली. यानंतर जिल्हा परिषदेमार्फत येथे कोल्हापूर टाईप बंधारा उभारण्यात आला. ग्रामस्थांनी एकत्र येत श्री देवी माऊली पाणी वापर संस्थेची स्थापना केली. 

बंधारा ओव्हरफ्लो

याच्या माध्यमातून या बंधाऱ्याच्या मंजूरीसाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला. अखेर याचे बांधकाम गेल्यावर्षी पूर्ण करण्यात आले; मात्र तोपर्यंत नदी आटली होती. यंदा या बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवण्यात आले. हे काम काल पूर्ण झाले. आज हा बंधारा ओव्हरफ्लो होवून वाहू लागला. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची एकजूट याच्या जोरावर कोलझर मधलीवाडीचे पाणीदार स्वप्न पूर्ण झाले. 

यंत्रणेची साथ, शेतकऱ्यांना आधार 
यासाठी श्री. नाडकर्णी यांच्यासह तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष, इतर पदाधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, कोलझर सरपंच सौ. देसाई, तळकटमधील या बंधाऱ्यालगत बागायती असलेले ग्रामस्थ, जलसंधारण अधिकारी श्री. काळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस. एम. अदन्नावार, जलसंधारण अधिकारी व्ही. आर. मोहिते, ठेकेदार सुनिल दळवी आदींची साथ मिळाली. यामुळे पिण्याबरोबरच बागायतीच्या पाण्याचीही सोय झाली. केवळ कोलझरच नाही तर दुसऱ्या काठावर असलेल्या तळकटमधील ग्रामस्थांनाही याचा फायदा होणार आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com