Republic Day 2021 : कोरोनातून बाहेर पडत विकासाचे उद्दीष्ट साधू : ॲड अनिल परब

राजेश शेळके
Tuesday, 26 January 2021

रत्नागिरीत प्रजासत्ताक दिन शानदार सोहळयात साजरा

रत्नागिरी : कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्यांने विकासाचे उद्दीष्ट समोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी आज प्रजासत्ताक दिनी केले. आज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर जिल्हयाच्या मुख्य शासकीय इमारतीत सोहळा  त्यांच्या हस्ते पार पडला त्या प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहण बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आदिंची प्रमुख उपस्थिती होती.                            

कोव्हीड-१९ च्या महामारीच्या काळात ज्यांनी समाजाचे आरोग्य राखण्यासाठी अपार मेहनत केली अशा सर्वांचा मी या प्रसंगी आवर्जून उल्लेख करतो असे सांगून पालकमंत्री म्हणाले की आता लसीकरण सुरु झाले आहे. याची व्यवस्थित आखणी व नियोजन करण्यात आलेली आहे, असे असले तरी कोरोना संपलेला नाही याची जाणीव सर्वांनी ठेवून मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशन ही त्रीसुत्री पुढेही जारी ठेवावी.

कोरोना काळात जिल्हयात विषाणू प्रयोगशाळा सुरु करण्यात आली. शासन नागरिकांच्या आरोग्यप्रती गंभीर आणि खंबीर आहे हे आम्ही सर्वांना दाखवून दिले असेही ते म्हणाले.
कोरोना काळात नियोजन निधी प्राधान्याने कोरोनासाठी खर्ची पडला. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे येत्या काळात पूर्ण निधी देवून अडलेली विकासकामे पूर्ण करण्यात येतील यात रस्ते व पर्यटनास प्राधान्य असेल. कोरोना काळात लॉकडाऊन  दरम्यान शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन थाळीच्या उपक्रमातून  ज्यांना भोजन मिळणे शक्य नव्हते आणि हजारो परप्रांतीयांना मोठा आसरा मिळाला असे सांगून ते म्हणाले की याच काळात महात्मा जोतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना राबवून  शासनाने शेतकऱ्यांनाही मदत  केली.                                          
आपत्ती मध्ये आपत्ती ठरलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी व रायगड जिल्हयाला सर्वाधिक बसला. त्याप्रसंगी शासनाने 176 कोटींची तातडीची मदत दिली.‍ विविध संकटात नुकसान झालेल्या मच्छीमारांसाठी देखील 60 कोटींचे पॅकेज शासनाने मदत म्हणून  दिले असे ते म्हणाले.

लॉकडाऊन आणि हापूस हंगाम एकाच वेळी आला त्यात बागायतदारांचे नुकसान होवू नये यासाठी ग्राहकांच्या दारापर्यंत हापूस पोहचवणे व काजू उत्पादकांना वस्तू व सेवा करातील राज्याचा पूर्ण हिस्सा अनुदान रुपात देवून प्रक्रिया उद्योगाला उभारणी देणे आणि कृषीपंप स्वखर्चाने लावणाऱ्या शेतकऱ्यांना बिलातून  परतावा देणे आदि विविध कल्याणकारी  निर्णय शासनाने घेतले आहेत. रत्नागिरी जिल्हयाला लाभलेल्या सागरी किनाऱ्यांचा विकास करुन आगामी काळात हे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून  विकसीत करण्याचा शासनाचा मानस आहे असे ॲङ अनिल परब म्हणाले.या प्रसंगी पोलीसदल तसेच इतर पथकांनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली.

शिघ्र कृती दलाचे एक प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे फेसबूकवर थेट प्रक्षेपण आज करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते कोव्हीड 19 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोव्हीड योध्दांचे, गुणवंत विद्यार्थी, गुणवंत खेळाडू , रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट काम करणारे तसेच दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार आदिं पुरस्कार देण्यात आले.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: republic day celebration in kokan ratnagiri marathi news flag hoisting Parliamentary Minister and Guardian Minister ad anil parab