esakal | ...त्यामुळे प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप
sakal

बोलून बातमी शोधा

Reservation facility at Devrukh bus stand closed for five days due to lack of internet

देवरुख बस स्थानकातील आरक्षण सुविधा इंटरनेट अभावी बंद

...त्यामुळे प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) : देवरुख बस स्थानकातील आरक्षण सुविधा गेले पाच दिवस इंटरनेट अभावी बंद असल्याने शेकडो प्रवाशांना आरक्षण उपलब्ध होवू शकले नाहीच आणि दररोज बस स्थानकात येण्याचा मोठा हेलपाटा पडत आहे . याबाबत आज जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे याबाबत कैफियत मांडण्यात येणार असल्याचे प्रवाशांनी सांगितले .

गेले पाच दिवस देवरुख बस स्थानकातील बंद असणाऱ्या इंटरनेट सुविधेमुळे गणेशोत्सवा नंतर मुंबईला जाण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे . ज्यांना ग्रूप बुकिंग करावयाचे आहे अशा प्रवाशांना एस टी बसने जाण्याची ईच्छा असूनही आरक्षण मिळत नसल्याने अनेक प्रवाशांनी खासगी बसचा पर्याय निवडला आहे . 

हेही वाचा- सिंधुदुर्गातील  या  कर्तव्यदक्ष  पोलिस निरीक्षकास राष्ट्रपती पदक -

दररोज देवरुख बस स्थानकात यायचे आणि इंटरनेट बंद आहे हे कारण ऐकून परत जायचे . यामुळे असंख्य प्रवाशांना दररोज प्रवासाचा आर्थिक फटका बसत आहे . ही इंटरनेट सुविधा कधी सुरु होइल , याबाबत काही ठोस उत्तर मिळत नसल्याने अखेर प्रवासी खासगी बसचा तिप्पट दराचा पर्याय नाईलाजाने स्विकारत आहेत . ऐन गणेशोत्सवाच्या काळात जर देवरुख बस स्थानकातील आरक्षण खिडकी पाच दिवस इंटरनेट सुविधा नाही म्हणून बंद रहात असेल , तर ही सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या हेतू बद्दल आम्हांला संशय वाटत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले असून प्रवाशी खासगी बसकडे वळावेत म्हणून हे जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे .

हेही वाचा-काजू उद्योगाबाबत सरकारने घेतला आहे हा महत्त्वपूर्ण निर्णय -

रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आज येणाऱ्या परिवहन मंत्र्यांना सदर गंभीर घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतर्फे केली जाणार आहे . देवरुखच्या आगार प्रमुख मृदुल जाधव यांनी इंटरनेट सुविधा बंद पडल्यानंतर ही सेवा पुरवणाऱ्या कंपनी जवळ वारंवार संपर्क केला असता त्यांच्या कडून येतो , करतो अशी साचेबध्द उत्तरे देण्यात आली . मात्र इंटरनेट सुविधा सुरळीत करण्याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही . 


कोविड १९ फैलावत असतांना आरक्षणासाठी गेले पाच दिवस दूरदूरच्या प्रवाशांना दररोज बस स्थानकात हेलपाटे मारायला लागणे हे अत्यंत धोकादायक आणि चुकीचे असल्याने आजच्या आज देवरुख बस स्थानकातील इंटरनेट सुविधा सुरु करुन विभाग नियंत्रकांनी प्रवाशांची होणारी ससेहोलपट थांबवावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे .

संपादन - अर्चना बनगे

loading image