
रत्नागिरी-सिंधुदुर्गची शेलारांवर जबाबदारी
चिपळूण: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी भाजपने कंबर कसली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी या मतदार संघाची जबाबदारी मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील भाजपमध्ये आमदार प्रसाद लाड यांच्याबरोबर शेलार यांचे महत्त्व वाढणार आहे. चार राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची स्वबळावर तयारी सुरू केली आहे. शिवसेना राष्ट्रवादीबरोबरची युती होण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभेसाठी बांधणी करण्यास सुरवात केली आहे. नुकतेच त्यांनी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत १२ नेत्यांवर आगामी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची सुत्रे भाजपचे मुंबई अध्यक्ष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.दरम्यान, भाजपकडून माजी खासदार नीलेश राणे, प्रमोद जठार यांची नावे चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवेशाच्या घडामोडी घडल्या नाही तर राणे किंवा जठार यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल. तत्पूर्वी, हा मतदार संघ बांधण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
भाजप राऊत यांच्यासमोर मोठे आव्हान करणार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी काँग्रेसचे खासदार म्हणून पाच वर्ष या मतदार संघाचे नेतृत्व केले. राणे वगळता सुरेश प्रभू, अनंत गीते यांनी या मतदार संघाचे दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. विनायक राऊत हे या मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजप त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे दिल्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. माजी आमदार प्रसाद लाड आणि आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. संघटना बांधणीसाठी भाजपला कोकणात पोषक वातावरण आहे, त्याचा उपयोग करून घेऊ.
- वसंत ताम्हणकर, तालुकाध्यक्ष चिपळूण
Web Title: Responsibility Ratnagiri Sindhudurg Shelar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..