esakal | रेवंडी ग्रामस्थांचे खाडीपात्रातच आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

rewandi villagers agitation konkan sindhudurg

ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले; मात्र येत्या आठ दिवसात खाडीपात्रातील अतिक्रमण न हटविल्यास तसेच कांदळवन, बंधारा तोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्यास पुन्हा पतन, वन, बंदर विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. 

रेवंडी ग्रामस्थांचे खाडीपात्रातच आंदोलन 

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) - खालची रेवंडी खाडीकिनाऱ्यालगत कांदळवन व पतन विभागाच्या बंधाऱ्याची काही व्यक्तींनी तोड करत अतिक्रमण केले; मात्र यावर संबंधित विभागांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आज संतप्त रेवंडी ग्रामस्थांनी रेवंडी खाडीपात्रातच आंदोलन छेडले. तहसीलदार अजय पाटणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत या प्रश्‍नाबाबत संबंधित विभागाकडून कारवाई सुरू असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांना दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले; मात्र येत्या आठ दिवसात खाडीपात्रातील अतिक्रमण न हटविल्यास तसेच कांदळवन, बंधारा तोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्यास पुन्हा पतन, वन, बंदर विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. 

यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पतन अधिकारी बोथीकर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, वनपाल श्रीकृष्ण परीट, वनसंरक्षक सारीका फकीर, पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, सरपंच प्रिया कांबळी, माजी सभापती सोनाली कोदे, माजी सरपंच युवराज कांबळी, सचिन मार्वेकर, विजय कांबळी, अजित कांबळी, भावेश कांबळी, अमोल वस्त, लक्ष्मण रेवंडकर, पोलिसपाटील मनोदया कांबळी आदी उपस्थित होते. 

युवराज कांबळी यांनी खाडीपात्रात जांभा दगड, माती टाकून मार्ग केला आहे. यामुळे खाडीचा प्रवाह बदलून गावे उद्‌धस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने विरोध दर्शवित प्रशासनाकडे तक्रार केली. शासकीय पंचनामे झाल्यानंतर कांदळवन, बंधारा तोड झाल्याचेही स्पष्ट झाले; मात्र सबंधितांवर अद्याप कारवाई झाली नाही, गुन्हेही दाखल झाले नाहीत. कांदळवन तोड हा गंभीर गुन्हा असताना शिवाय शासकीय पंचनामा होऊनही वनविभागाने का कारवाई केली नाही? पतन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या बंधाऱ्याची तोड झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले असतानाही त्यांनी पुढील कारवाई का केली नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला. कांदळवन व बंधारा तोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तत्काळ अतिक्रमण हटविणे याच ग्रामस्थांच्या मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

तहसीलदारांकडून दखल 
रेवंडी खाडीपात्रात झालेल्या अतिक्रमणाची तहसीलदार अजय पाटणे यांनी भेट देत पाहणी केली. पाटणे म्हणाले, रेवंडी ग्रामपंचायत हद्दीतील खालची रेवंडी येथील खाडीकिनारी असलेला धूपप्रतिबंधक बंधारा तोडल्याचा प्रश्‍न विविध शासकीय विभागाशी संबंधित आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी सुरू आहे. त्यादृष्टीने कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन व्हायला हवे. या दोन्ही गोष्टींचा विचार करता उपोषण स्थगित करावे. 

अतिक्रमण हटविण्याची मागणी 
खालची रेवंडी खाडीकिनाऱ्यालगत कांदळवन व पतन विभागाच्या बंधाऱ्याची तोड काही व्यक्तींनी करत खाडीपात्रात अतिक्रमण केल्याने गावात पाण्याची समस्या भेडसावणार आहे. रेवंडी गावात पाण्याचे स्रोत कमी आहेत. या अतिक्रमणामुळे खारे पाणी किनाऱ्यावरून आत घुसल्याने विहिरी व विंधनविहिरीद्वारे खारे पाणी आल्यास त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणार आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार पाटणे यांच्याकडे केली. 

संपादन - राहुल पाटील

loading image