शाळेच्या पडीक जमिनीत विद्यार्थ्यांनी केली भातशेती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

सावंतवाडी - सोनुर्ली हायस्कूलने नुकतेच बांधावरची शाळा उपक्रमाचे आयोजन करत विद्यार्थ्यांनी शेतीचे धडे गिरविले. सोनुर्ली माऊली माध्यमिक विद्यालयाच्या शेतीशाळेचे  मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, मुलांनी आपल्या शाळेसाठी केलेली स्वतःची शेती होय. यासाठी शाळेने जवळपास असणारी लागवड योग्य पडीक क्षेत्राची निवड केली व त्यासाठी लागणारी भाताची रोपे (तरवा) शाळेच्याच परिसरात तयार केली.

सावंतवाडी - सोनुर्ली हायस्कूलने नुकतेच बांधावरची शाळा उपक्रमाचे आयोजन करत विद्यार्थ्यांनी शेतीचे धडे गिरविले. सोनुर्ली माऊली माध्यमिक विद्यालयाच्या शेतीशाळेचे  मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, मुलांनी आपल्या शाळेसाठी केलेली स्वतःची शेती होय. यासाठी शाळेने जवळपास असणारी लागवड योग्य पडीक क्षेत्राची निवड केली व त्यासाठी लागणारी भाताची रोपे (तरवा) शाळेच्याच परिसरात तयार केली. त्यानंतर नांगरणी करून सुमारे पंधरा गुंठे क्षेत्रात शिक्षकांच्या व गावातील काही शेतकऱ्यांच्या मदतीने भाताच्या रोपांची लावणी (रोपणी) केली.

 या शेतीचा मुख्य उद्देश लागवड योग्य पडीत क्षेत्र लागवडीखाली आणणे व शेतीबद्दल तरुण पिढीमध्ये आवड निर्माण करणे, हे असल्याचे शिक्षकांनी सांगितले. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी आडसुळे, कृषि पर्यवेक्षक विजयकुमार वाघमारे, कृषि सहाय्यक यशवंत गव्हाणे, श्रीमती एस. एस. देसाई, श्रीमती पी.पी.सावंत, ग्रामसेवक वामन कुबल यांनी मुलांना रोपणीविषयी मार्गदर्शन केले व श्री पद्धतीने रोपांची लावणी करण्यात आली.

शालेय समिती अध्यक्ष नागेश गावकर, भाऊ गावकर, मुख्याध्यापक संतोष मोर्ये, पी.जी. काकतकर, श्री. सावंत, श्री. तेरसे, श्री. गवंडळकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे कर्मचारी नाईक, राजेंद्र गावकर, संतोष ओटवणेकर, संदीप जाधव, बापू निर्गुण उपस्थित होते. शेतकरी विश्राम नाईक, नाना पालयेकर, दाजी अणावकर, संतोष नाईक, बबन मठकर, मधू मठकर उपस्थित होते. मुलांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे.

एक दिवस शेतात काम न करता ...
फक्त एक दिवस शेतात काम न करता विद्यार्थी या शेतीतील पुढची सर्व कामे स्वतः करणार आहेत. शेतीतील तांदळाचं जे उत्पन्न मिळणार आहे, त्याचा वापर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ’पोषण आहारामध्ये’ करणार असे विद्यार्थ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice cultivation done by the students in Sonurle