पावसाच्या सावटात भातकापणीची घाई 

भूषण आरोसकर
Saturday, 10 October 2020

पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजा भात कापणीच्या तयारीत असताना अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरीने शेतकरी चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी कोसळत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. भातशेतीत पावसाचे पाणी शिरल्याने उभी असलेली भातशेती आडवी झाली आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - परतीच्या पावसाने परिपक्व झालेली भातशेती कापणी लायक बनली आहे; मात्र परतीच्या पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंतेत आहे. भात कापणीच्या हंगामाकडे आता शेतकऱ्यांनी मोर्चा वळविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात प्रमुख पीक म्हणून भातशेतीकडे पाहिले जाते. जिल्ह्यात 63 हजार 700 हेक्‍टर भात लागवडीचे उद्दिष्ट होते. 

यामध्ये 5 हजार 214 हेक्‍टरवर भात बियाण्यांची पेरणी केली होती. यात संकरित, सुधारित आणि पांरपरिक बियाण्यांचा समावेश होता. जमिनीच्या पोतप्रमाणे भात बियाण्यांची पेरणी आणि रोपांची लागवड केली जाते. अलीकडच्या काळात सुधारित आणि संकरित बियाणे पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. गेले काही दिवस हवामानातील बदलांचा परिणाम शेतीवर होत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजा भात कापणीच्या तयारीत असताना अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरीने शेतकरी चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी कोसळत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. भातशेतीत पावसाचे पाणी शिरल्याने उभी असलेली भातशेती आडवी झाली आहे. 

भातशेती चांगली परिकत्व झाली आहे. काही ठिकाणी फुलोऱ्यावर आलेली भातशेती पिवळी धमक होत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला होता. पडणाऱ्या अधून-मधून पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 
जुलैच्या पहिल्या आठवड्यात भातरोपे लागवडीस पोषक पाऊस पडल्यामुळे गती मिळाली. 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात 44 हजार हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवडीचे काम पूर्ण झाले होते. 27 जुलैला 55 हजार हेक्‍टरवर भात लागवडीचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. रोहिणी नक्षत्रात यंदा पावसाने सलामी दिली होती. यावर्षी समाधानकारक असेल असा अंदाज होता. 

यंदाही संकटे 
पावसाने सातत्य राखल्याने भातशेती चांगली फुलोऱ्यात आली होती. कोसळलेल्या पावसाने शेतात उभी असलेले भातपिक आडवे झाले. गतवर्षी प्रमाणे यंदाही बळीराजा संकटात सापडला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पिवळी धमक झालेली भातशेती बळीराजा कापण्याच्या तयारीत असताना अधून-मधून पडणाऱ्या पावसाने सरीने बळीराजाची चिंता सतावू लागली आहे. 

मजुरांचा शोध 
हळव्या व निमगाव भाताची आता कापणी होणार आहे. ढगाळ वातावरण पाहता शेतीचे नुकसान न होणे यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोर्चा भातकापणीकडे वळविला आहे. या आठवड्यामध्ये भात कापणीला हळूहळू वेग येणार आहे. त्यामुळे परिपक्व झालेले भात पावसाच्या घशात पडू नये, यासाठी मजुरांचे शोधाशोध होऊ लागली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice harvesting at Sindhudurg