esakal | कणकवलीतील रिंगरोडचा पुढचा टप्पा दृष्टिक्षेपात 
sakal

बोलून बातमी शोधा

ring road issue konkan sindhudurg

शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या या रिंगरोडचा आचरा रोड ते गांगोमंदिर हा पहिला टप्पा गेल्या वर्षी पूर्ण झाला. यंदा या रस्त्याचे डांबरीकरण झाले असून लवकरच या रस्त्याचे लोकार्पण होणार आहे.

कणकवलीतील रिंगरोडचा पुढचा टप्पा दृष्टिक्षेपात 

sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील रिंगरोडच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. या दोन्ही टप्प्यातील जागेचे संपादन जमीन मालकांच्या संमतीने पूर्ण झाले असून या आठवड्यात जमिनीचे सपाटीकरण होईल. एप्रिल-मेमध्ये रस्त्याचे खडीकरण तर पुढील वर्षी डांबरीकरण होणार आहे. 

शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या या रिंगरोडचा आचरा रोड ते गांगोमंदिर हा पहिला टप्पा गेल्या वर्षी पूर्ण झाला. यंदा या रस्त्याचे डांबरीकरण झाले असून लवकरच या रस्त्याचे लोकार्पण होणार आहे. तर गांगोमंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर आणि चौंडेश्‍वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. या आठवड्यात संपादीत जागेचे सपाटीकरण केले जाणार असून प्रत्यक्ष कामाची टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च येणार आहे. त्यासाठीची तरतूदही नगरपंचायतीने केली आहे. 

गांगोमंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर या दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोडमध्ये दोन घरांचा काही भाग बाधित होत आहे. याखेरीज चौंडेश्‍वरी मंदिर परिसरातील गणेशमंदिर, विहीर, पुरोहितांची खोली आणि जेवण हॉल बाधित होत असून त्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. चौंडेश्‍वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर या तिसऱ्या टप्प्यात रिंगरोडमध्ये चार घरे पूर्णतः बाधित होत आहेत तर इतर दोन घरांची शौचालये बाधित होत आहे. या सर्व बाधित मालमत्तांना केंद्राच्या भूसंपादन कायदा 2013 नुसार अडीचपट भरपाई दिली जाणार आहे. सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांची नुकसान भरपाई रक्‍कम लवकरच संबंधितांना दिली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. 

कणकवली शहरातील सर्व वाड्यांना जोडणारा रिंगरोड शहर विकास आराखड्यात 1999 मध्ये समाविष्ट केला होता; मात्र निधीची चणचण तसेच भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे, काही जागा मालकांचा विरोध यामुळे शहरातील रिंगरोडचे काम मार्गी लागले नव्हते. एप्रिल 2018 मध्ये नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी शहराची सूत्रे हातात घेतल्यानंतर रिंगरोडला प्राधान्य दिले. त्यानुसार गतवर्षी रिंगरोडचा पहिला टप्पा पूर्ण झाला. तर पुढील वर्षभरात दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे. निधीची उपलब्धता झाली तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील रिंगरोडचेही काम पुढील दोन वर्षात मार्गी लावणार असल्याचा विश्‍वास नगराध्यक्ष नलावडे यांनी व्यक्‍त केला. 
 

असा आहे रिंग रोड 
* पहिला टप्पा ः आचरा रोड ते गांगो मंदिर (पूर्णत्वास) 
* दुसरा टप्पा ः गांगोमंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर (लवकरच प्रारंभ) 
* तिसरा टप्पा ः चौडेंश्‍वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर (लवकरच प्रारंभ) 
* चौथा टप्पा ः रवळनाथ मंदिर ते दत्तमंदिर बांधकरवाडी तिठा (पुढील वर्षी काम सुरू होण्याची शक्‍यता) 
* पाचवा टप्पा ः नरडवे तिठा, बिजलीनगर, नेहरू नगर ते आशिये रोड (पुढील दोन वर्षात प्रस्तावित) 

रिंगरोडचे फायदे 
* दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात टेंबवाडी, फौजदारवाडी, निम्मेवाडी, सुतारवाडी, भटवाडी, मधलीवाडी, बांधकरवाडी रिंगरोडला जोडणार. 
* अंतर्गत रस्ते नसल्याने शहरातील यलो झोनमध्ये बांधकामे झाली नव्हती. त्याभागात नव्या घरकुलांची, वसाहती उभारणार 
* शहरातील बाजारपेठेला पर्यायी रस्ता तयार होणार. शहर विकासाला चालना शक्‍य 
* रिंगरोडची रुंदी 12 मिटर. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटार आणि त्यावर फुटपाथ. 
* रिंगरोडच्या प्रत्येक शंभर ते दीडशे मिटर अंतरावर बैठक व्यवस्था. 
* रिंगरोडच्या दोन्ही बाजूंनी जलवाहिनी तसेच पथदीप, गॅसवाहिनी, भूमिगत वीज वाहिनीसाठी व्यवस्था. 

शहरातील बाजारपेठ आणि रेल्वेस्थानक रोड परिसरातच मोठ्या प्रमाणात निवासी, व्यापारी बांधकामे झाली. त्याच भागात शहराची सर्वाधिक लोकसंख्या वसली आहे; मात्र शहराचा उत्तर आणि पूर्व दिशेचा 60 टक्‍के भाग अंतर्गत रस्त्यांचे जाळे नसल्याने अविकसित राहिला. रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व वाड्या एकमेकांना जोडल्या जातील. रिंगरोड प्रशस्त असल्याने शहराच्या कुठल्याही वाडीतून अन्य कुठल्याही भागात सहज ये-जा करता येणार आहे. यात शहराच्या विकासालाही चालना मिळेल. 
- बंडू हर्णे, उपनगराध्यक्ष, कणकवली 

संपादन - राहुल पाटील