रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? तरीही प्रशासन सुशेगाद, आंदोलनाचा इशारा

अजय सावंत
Wednesday, 9 September 2020

या रस्त्याची दुरवस्था राज्यकर्ते व सत्ताधारी पक्षातील नेत्यांना दिसत नाही का?, एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का?

कुडाळ (सिंधुदुर्ग) - शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. कुडाळ-वेंगुर्ले राजमार्गावरील पिंगुळी ते वाडीवरावडे रस्ताही धोकादायक ठरला आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? तत्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा वेंगुर्ले नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष शेखर कोयंडे यांनी दिला आहे. 

श्री. कोयंडे म्हणाले, वेंगुर्ले-कुडाळ मार्ग पिंगुळी ते वाडीवरावडे दरम्यान रस्ता धोकदायक आहे. त्यामुळे काही जण हा मार्ग टाळत आहेत. बरेच लोक आडेलीमार्गे कुडाळला जात आहेत. या रस्त्याची दुरवस्था राज्यकर्ते व सत्ताधारी पक्षातील नेत्यांना दिसत नाही का?, एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का? आठ दिवसांत दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. 

कुडाळ-नेरूरपार-मालवण रस्ता दूरवस्थेबाबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनानंतर संपूर्ण तालुक्‍यातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तालुक्‍यातील प्रत्येक भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. गेली दोन-तीन वर्षे या रस्त्यांची कोणतीही डागडुजी व दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना जीव गमवावा लागला आहे. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदने देऊनही दखल घेतलेली नाही. आता कोरोनाचे कारण पुढे करून सरकारची अकार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न होत आहे. 

आता एकाच वेळी आंदोलन 
लॉकडाउनमुळे या रस्त्यावरील वाहतूक फार कमी प्रमाणात होती; मात्र अशा परिस्थितीतही तालुक्‍यातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यामुळे अशा प्रकारचे अनोखे आंदोलन करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न होत आहे. तालुक्‍यातील ज्या-ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व वाहनधारक एकाच दिवशी रास्तारोको करून आंदोलन करतील, असे देसाई म्हणाले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road conditions bad in kudal taluka konkan sindhudurg