महाड : तुळशीखिंड रस्ता गेला वाहून; वाहतूक ठप्प

सुनील पाटकर
Friday, 6 September 2019

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून तयार करण्यात आलेल्या महाड तुळशीखिंड नातूनगर मार्गे खेड हा रस्ता फाळकेवाडी गावाजळील वळणावर वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून तयार करण्यात आलेल्या महाड-तुळशीखिंड-नातूनगर मार्गे खेड हा रस्ता फाळकेवाडी गावाजळील वळणावर वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन गणेशात्सवात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडल्याने गणेशभक्तांचा पर्यायी मार्ग बंद झाला आहे.

दरम्यान, हा रस्ता कोसळत असतानाच दोन्ही बाजूने काही वाहने येत होती. परंतु ती वेळीच थांबविण्यात आल्याने या ठिकाणी अनर्थ टळला आहे . महाड तुळशी खिंड खेड मार्ग रस्ताकशेली घाटासाठी पर्यायी मार्ग म्हणून तयार करण्यात आलेला आहे. गणेशोत्सव काळामध्ये या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूकही केली जात असते.

2005 साली मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती त्यामध्ये कशेडी घाटात दरड कोसळल्यामुळे घाट दहा दिवस बंद होता त्यामुळे कच्च्या स्वरुपात असलेला हा रस्ता कशेडी घाटासाठी पर्याय म्हणून कायमस्वरुपी चांगल्या दर्जाचा तयार करण्यात आला होता. महाड व परिसरामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असून, मुसळरधार पावसाने या रस्त्याचा फाळकेवाडी गावाच्या पुढे असणाऱ्या वळणावराचा सुमारे 25 फूट लांबीचा भाग मुळासकट पूर्णपणे वाहून नेला आहे. यामुळे येथे 200 मीटर खोल भाग तयार झाला आहे. ही घटना घडल्यानंतर माजी सभापती सिताराम कदम तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी तातडीने धाव घेतली व येथील प्रवाशांना व वाहनचालकांना सतर्क करण्याचे कामही केले.

गणेशोत्सवामध्ये हा रस्ता वाहून गेल्याने हा पर्यायी मार्गही वाहतुकीला आता बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोयही होणार आहे. रस्त्याची दुरुस्ती ही तातडीने होणे कठीण असल्याने हा मार्ग पावसाळा संपे पर्यंत तरी बंद राहणार आहे. मागील महिन्यात वरंध घाटात रस्ता कोसळल्याने महाड-पुणे मार्ग बंद झालेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road damage in mahad; kashedi ghat on closed