esakal | बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजप आक्रमक 

बोलून बातमी शोधा

road issue banda dodamarg kokan sindhudurg

जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. अखेर आजच या कामाची ऑनलाइन निविदा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली. 

बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजप आक्रमक 
sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बांदा- दोडामार्ग रस्त्यावरून आज पुन्हा भाजपने बांधकाम विभागाला धारेवर धरले. आम्ही पुकारलेले तिरडी आंदोलन तुमच्या आश्‍वासनामुळे केले नाही; मग आतापर्यंत रस्त्याचे काम का नाही झाले? असा संतप्त सवाल पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना केला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. अखेर आजच या कामाची ऑनलाइन निविदा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली. 

पालकमंत्री उदय सावंत व आमदार दीपक केसरकर जनतेची दिशाभूल करत असून पालकमंत्र्यांच्या भावाला ठेका मिळत नसल्याने हे काम अडवल्याचा आरोपही नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. बांदा - दोडामार्ग रस्त्यावर पडलेले खड्डे आणि होणारे अपघात लक्षात घेता सावंतवाडी आणि दोडामार्ग भाजपच्यावतीने रस्त्याबाबत आवाज उठविण्यात आला होता. रस्त्याचे काम महिन्याभरात मार्गी न लागल्यास तिरडी आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी रस्तेकामाबाबत आश्‍वासन देऊन तिरडी आंदोलन करण्यापासून पदाधिकाऱ्यांना रोखले होते; मात्र मे महिना जवळ आला तरी रस्त्याच्या कामाबाबत काहीच हालचाली दिसून न आल्याने आज पुन्हा बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता माने यांना जाब विचारला.

यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष परब, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, नगरसेवक मनोज नाईक, बंटी राजपुरोहित, डी. के. सावंत, मकरंद तोरसकर, केतन आजगावकर, विनोद राऊळ, बाळा आकेरकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष परब म्हणाले, ""बांदा-दोडामार्ग रस्ता दुरवस्थेवरुन लोकांचा अंत पाहू नका. एकीकडे पालकमंत्री स्थानिक आमदार रस्त्याबाबत जनतेला आश्‍वासन देत आहेत; मात्र प्रत्यक्षात काहीच नाही. निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळे या जिल्ह्याची वाताहत झाली असून तब्बल तीन वेळा निवडून दिलेले स्थानिक आमदार केसरकर हे कुचकामी ठरले आहे.'' 

एकनाथ नाडकर्णी म्हणाले, ""तिरडी आंदोलन करू नका. रस्तेकाम मार्गी लावू, असा शब्द दिला त्याचे काय झाले? भीक मांगो आंदोलनही केले; मात्र या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील रस्ते होत असताना मात्र महत्वाच्या या रस्त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. जोपर्यंत लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही.'' यावेळी तब्बल दोन तास ठिय्या मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आजच ऑनलाइन निविदा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी तिथून माघार घेतली. 

55 लाख गेले कुठे? 
बांदा - दोडामार्ग रस्त्यासाठी देखभाल दुरुस्तीचे 55 लाख रुपये मंजूर असल्याचे कार्यकारी अभियंता माने यांनी सांगितले. मग ते 55 लाख रुपये गेले कुठे? असा सवाल करत संबंधित ठेकेदाराला पाचारण करण्यात आले. दोन वर्षांपासून एक कोटीची कामे केली. पैकी केवळ चार लाख रुपये "बांधकाम'कडून बिलापोटी मिळाल्याचे ठेकेदाराने सांगितले. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचेही तो म्हणाला. 

संपादन - राहुल पाटील