आंबोली घाटात रस्ता खचला

अनिल चव्हाण
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

आंबोली - येथे मुसळधार पावसाने घाटात रस्ता खचला आहे. आंबोली धबधब्याच्या ठिकाणी दगड, माती रस्त्यावर आली आहे. यामुळे हा घाट रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा आला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात यावी,  अशी सुचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केली आहे. 

आंबोली - येथे मुसळधार पावसाने घाटात रस्ता खचला आहे. आंबोली धबधब्याच्या ठिकाणी दगड, माती रस्त्यावर आली आहे. यामुळे हा घाट रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा आला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात यावी,  अशी सुचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केली आहे. 

 एकंदरीत आंबोलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील नदी, नाले यांना पुरसदृश्‍य स्थिती होती. रस्त्यावर तसेच सर्वच ठिकाणी शुकशुकाट आणि पावसाचे थैमान दिसत होते. अनेक ठिकाणी पडझडीमुळे नुकसान झाले आहे. 

आंबोलीत मुसळधार पावसामुळे कामतवाडी येथे सावित्री सखाराम गावडे यांच्या घरावर झाड पडून पत्रे फुटून नुकसान झाले. सुखमती सुरेश राणे यांचे वारा पाऊस यामुळे नळे उडाले. गुंडू कृष्णा गावडे, दशरथ भिसजी सावंत यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.

गुणाजी शंकर गावडे, वसंत गावडे यांचे पत्रे उडाले. नांगरवाक धनगरवाडी येथील जानू बमू यमकर (एक म्हैस), सोनू पांडुरंग कोकरे (एक म्हैस, एक वासरू) वाहून गेले. गेळे येथे संतोष कदम ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या घरावर झाड पडून छप्पराचे नुकसान झाले. पंचनामा करण्यासाठी कोतवाल लाडू गावडे यांनी पाहणी केली; मात्र तलाठी आणि आपत्कालीन अधिकारी घाट आणि वाटेत पाणी आले असल्याने पोहचू शकले नाहीत. 

यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला होता. धबधबे जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले होते. जुनमध्ये अवघा 47 इंच एवढा पाऊस झाला होता; मात्र 29 जुलैपासून पावसाने दमदार हजेरी लावून झोडपून काढले. त्यामुळे पावसाने यावर्षी सर्वाधिक नोंद कमी दिवसात सध्याच्या दिवसापर्यंत केली आहे.

येथे आतापर्यंत 226 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दरवर्षी साधारण चतुर्थी पर्यंत जवळपास एवढा पाऊस नोंद होतो; मात्र श्रावणातील पहिला आठवडा धुव्वाधार पावसाचा ठरला. श्रावणमासी हर्ष मानसी असे कुठेच दिसत नाही. पुरसदृश्‍य स्थिती आहे. उशिरा सुरु झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road lost in Amboli Ghat due to Land slice