संगमेश्‍वरात रोमिओला विद्यार्थिनींनी भर रस्त्यावर चोपला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

संगमेश्‍वर - भर बाजारपेठेत विद्यार्थिनीचा पाठलाग करून छेड काढणे एका रोमिओला चांगलेच महागात पडले. त्या विद्यार्थिनींच्या मैत्रिणींनी रोमिओचा पाठलाग करीत त्याला यथेच्छ चोप दिला. हा प्रकार भर रस्त्यावर घडल्याने सगळेच अवाक झाले.

संगमेश्‍वर - भर बाजारपेठेत विद्यार्थिनीचा पाठलाग करून छेड काढणे एका रोमिओला चांगलेच महागात पडले. त्या विद्यार्थिनींच्या मैत्रिणींनी रोमिओचा पाठलाग करीत त्याला यथेच्छ चोप दिला. हा प्रकार भर रस्त्यावर घडल्याने सगळेच अवाक झाले. 

संगमेश्‍वरला शिक्षणासाठी येणारी विद्यार्थिनी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या संस्थेकडे जात होती. त्याचवेळी संगमेश्‍वर बाजारपेठेत तिला एक जण आपला पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले. तो युवक पाठलाग सोडत नसल्याने घाबरलेली ती मुलगी एका बॅंकेत शिरली. आत जाऊन तिने तातडीने आपल्या शिक्षकांना फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर शिक्षकांनी तिला पोलिस ठाण्यात नेले. तिथे मोघम तक्रार दिल्यानंतर ती विद्यार्थिनी विद्यालयात गेली.

आज संध्याकाळी ती विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींसोबत पुन्हा त्याच मार्गाने येत असता तोच युवक बाजारपेठेत एका ठिकाणी उभा असल्याचे तिने पाहिले. तिने याची माहिती मैत्रिणींना देताच त्या मैत्रिणींनी त्याचा पाठलाग सुरू केला. शहरातील जनता बॅंकेलगतच्या बोळातून तो पळाला. जवळपास अर्धा किलोमीटर लांब पाठलाग करत असताना त्या शिक्षण संस्थेतील एका कर्मचाऱ्याने त्या रोमिओला महामार्गावर पकडून देण्यात मुलींना मदत केली. तो रोमिओ हातात सापडल्यानंतर उपस्थित सर्वांनीच त्याला भर रस्त्यात प्रसाद दिला. घडला प्रसंग पाहणाऱ्यांनी तातडीने त्या विद्यार्थिनीसह संगमेश्‍वर पोलिस ठाणे गाठले. संध्याकाळी उशिरापर्यंत या प्रकाराची नोंद करण्याचे काम सुरू होते. 

छेड काढण्याचे प्रकार 
रोमिओंना चोप देण्याचा प्रकार मात्र पहिल्यांदाच घडला आहे. नजीकच्या कसबा आणि शास्त्रीपूल परिसरात दिवसाढवळ्या महिला आणि विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याबाबत कोणीच आवाज उठवत नसल्याने रोमिओंचे चांगलेच फावले आहे. आज घडलेल्या या प्रकाराने निदान रोमिओंना तरी चपराक बसेल, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Romeo incidence in Sangmeshwar