खारेपाटण मध्ये पूरस्थिती कायम, शहरात येण्याचे सर्व मार्ग बंद ; जैनवाडीचा संपर्क तुटला

राजेश सरकारे
Wednesday, 5 August 2020

गड आणि जाणवली या दोन्ही नदयांची पात्र दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर पाहता पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग)  : कणकवली शहर आणि तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. गड आणि जाणवली या दोन्ही नदयांची पात्र दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसासह वाऱ्याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी वीज तारांवर झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तालुक्यात दुपारी बारा पर्यंत कुठेही नुकसानीची नोंद झाली नव्हती. मात्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने कणकवली मार्गावरील वरवडे आणि कणकवली कासरल या मार्गावरील वागदे येथील कॉलेजवर पाणी आले आहे.

हेही वाचा - चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी ; भरती वेळी पाणी वाढण्याची शक्यता...

इकडे खारेपाटण शहरात दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती कायम राहिली आहे. मध्यरात्री एक वाजल्यानंतर शहरात पुराचे पाणी आल्याने व्यापारी वर्गाची मोठी धावपळ उडाली होती. सध्याच्या घडीला बाजारपेठेत दोन फुटापर्यंत पाणी आहे. पावसाचा जोर पाहता पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -  रत्नागिरीत अतिवृष्टी : संगमेश्वरमध्ये बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली....

खारेपाटण शहरालगत वाहणाऱ्या सुख नदीला तसेच वैभववाडी, राजापूर तालुक्यातील सहा उपनगरांचे पाणी येऊन मिळते. गेले दोन दिवस या दोन्ही तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने सुखनदीला पूर आला आहे. त्यामुळे खारेपाटन शहरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येण्याचा धोका वाढला आहे. शहरात येणारे दोन्ही मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जैनवाडीकडे जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने जैनवाडीचा संपर्क तुटला आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roads blocked due to flood kharepatan in sindhudurg